संघटनातूनच शेतकऱ्यांचा विकास शक्‍य : प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता

वर्धा येथे एमएसडीपीतंर्गत कार्यशाळा
वर्धा येथे एमएसडीपीतंर्गत कार्यशाळा

वर्धा ः संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमएसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌घाटन सोमवारी विकासभवन येथे झाले. याप्रसंगी ते बोलत होते. 

‘सकाळ'च्या सिमॅसिस लर्निंग एलएलपी व पॅलेडियम इंडियाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमात प्रशिक्षित झालेल्या आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, एमएसडीपीचे योगेश खिराळे, ‘नाबार्ड'चे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण मुळे, धनंजय वाघ, ‘सकाळ'चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांची उपस्थिती होती. 

या वेळी श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची पसंती आणि आधारभूत माहितीच्या सहायाने प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीसाठी स्वतंत्र व्यवसाय योजना विकसित करण्यात येईल. शेतकऱ्यांकडून व्यवसाय आराखडे तयार करून ते शासनाकडून मंजूर करून घेण्यात येतील.''

जिल्हाधिकारी भिमनवार यांनी, गटशेतीशिवाय शेतकऱ्यांचा विकास शक्‍य नसून उत्पादक कंपन्यांनी शेतमाल प्रक्रिया व विक्री यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे सांगितले. कार्यशाळेची प्रस्तावना श्री. शैलेश पांडे यांनी केली.

कार्यशाळेत वेल्सस्पनचे चंद्रमोहन बांड यांनी कापूस खरेदीची, बाय ॲग्रोचे हसन रफीक यांनी भाजीपाला खरेदी व निर्यात तर जीव्हीआर न्युट्रीज कंपनीचे वरुण राठी यांनी तूर, हरभरा खरेदीची माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या.

त्यात वर्धा जिल्ह्यातील वायगाव शेतकरी उत्पादक कंपनीचे पंकज भगत यांनी हळद, वसुंधरा शेतकरी उत्पादक कंपनीचे राजाभाऊ देशमुख यांनी सेंद्रिय कापूस खरेदी, वाशीम जिल्ह्यातील श्रीबाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे बालखंड यांनी बीजोत्पादन तर कृषी माऊली शेतकरी उत्पादक कंपनीचे दिलीप फुके यांनी शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री व ऑनलाइन शेतमाल विक्री याबाबत अनुभव कथन केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com