सटाणा तालुक्यातील ऊस जळण्यास महावितरणच जबाबदार

नाशिक : सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा नऊ एकर ऊस जळून खाक झाला होता. त्यानुसार ऊस जळिताच्या घटनेस महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 MSEDCL is responsible for burning sugarcane in Satana taluka
MSEDCL is responsible for burning sugarcane in Satana taluka

नाशिक : सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा नऊ एकर ऊस जळून खाक झाला होता. याबाबत उद्योग, ऊर्जा कामगार विभाग कार्यालयाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाने पंचनामे करून चौकशी केली. त्यानुसार ऊस जळिताच्या घटनेस महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत चौकशी अहवाल देण्यात आला आहे. आता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याची प्रतीक्षा आहे. 

सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील गट नं.३२३/०१,३२३/०२, ३२३/०३,३२६ येथील शेतकरी दिगंबर धर्मा बोरसे, योगेश दिगंबर बोरसे, विमलबाई बोरसे, वंदना साहेबराव काकुळते यांचा ऊस जळाला होता. या प्रकरणाची चौकशी  भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६१ नुसार प्राधिकृत केल्याप्रमाणे ४ नोव्हेंबर रोजी विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आली. त्यानुसार २० लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

घटनास्थळी विमलबाई बोरसे यांच्या शेतातून ३ फेजच्या ३ वायरची लघुदाब वाहिनी गेली आहे. या शेतामध्ये जुनी लघुदाब वाहिनी आहे. वाहकांमधील अंतर कमी होते. दोन खांबांमधील अंतर जास्त होते. तसेच रोहित्राच्या वितरण पेटीतील फ्युजतार योग्य क्षमतेची बसविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अंदाजे दुपारी ०३:३० वाजेच्या सुमारास लघुदाब वाहिनीतील ‘वाय फेज व ''बी'' फेज वाहकांमध्ये घर्षण होऊन त्यातील ‘बी’ फेज वाहक तुटून खाली पडला. यावेळी घर्षण होऊन ठिणग्या उसावर पडून आग लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अद्याप विद्युत निरीक्षक कार्यालयाचा अहवाल प्राप्त झाला नाही आहे. मात्र, चौकशी अहवाल आल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न राहील.  - रमेश सानप, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी, मालेगाव. 

ऊस जळीत घटनेस महावितरण जबाबदार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने लवकर नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी. - दिगंबर बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com