शिक्षकाने सुरु केलेल्या झेंडू फुल खरेदी अभियानास चांगला प्रतिसाद

झेंडू फुले अभियानामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढले. हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून जादा दराने खरेदी केली. किमान ५० रुपये दराने ५०० ग्राहक झेंडू खरेदी करतील, अशी अपेक्षा होती. परंतु जनजागृती केल्यामुळे राज्यभरातून या अभियानाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. खासदार राजीव सातव यांनीदेखील १०० रुपये किलो दराने फुले खरेदी केली. झेंडू फुले अभियानाचे कौतुक केले. - अण्णा जगताप, हिंगोली.
झेंडू फुले अभियान
झेंडू फुले अभियान

परभणी : दुष्काळी परिस्थिमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून किमान ५० रुपये प्रतिकिलो दराने झेंडू फुलांची खरेदी करावी, यासाठी सोशल मीडियावरून राबविण्यात आलेल्या झेंडूची फुले अभियानास हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांना किमान २५ रुपये किलो दराने खरेदी करावी लागली. दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बुधवारी (ता. ७)  दुपारनंतर परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी झेंडूच्या फुलांचे दर ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोचले होते. झेंडूची फुले अभियानाचे हे यश आहे, असे या अभियानाचे प्रवर्तक अण्णा जगताप यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली होती. दसऱ्याला दर कोसळल्यामुळे दर कमी होऊनही विक्री न झालेली फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागली होती. परभणी, नांदेड जिल्ह्यातही अशी परिस्थिती होती. दसऱ्याप्रमाणेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रस्त्यावर फुले  फेकून देण्याची वेळ येऊ नये.  झेंडूस चांगले दर मिळावेत, शेतकऱ्यांचा अधिक फायदा व्हावा, या उद्देशाने पुंगळा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील रहिवासी आणि सध्या जवळा (ता. सेनगांव, जि. हिंगोली) येथील एका शाळेतील शिक्षक अण्णा जगताप यांनी काही दिवसांपूर्वी झेंडू फुले अभियान मोहीम सुरू केली. फटाके, रांगोळी आदीवरील खर्च कमी करून प्रदूषमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी झेंडूच्या फुलांनी घरांची सजावट करावी, रांगोळ्या काढाव्यात, असे आवाहन करण्यात आले. त्यादृष्टीने सोशल मीडियावर (व्हाॅट्‌सअॅपवर) झेंडूंची फुले नावाने ग्रुप तयार करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी जागृती झाली. विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिकांना प्रत्यक्ष भेटून किमान ५० रुपये किलो दराने झेंडूची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक जणांनी परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन झेंडूंच्या फुलांची ५० रुपये किलो दराने ॲडव्हान्स बु.िकंग केली.  बुधवारी (ता. ७) लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलाची मागणी लक्षात घेऊन या अभियानाअंतर्गत हिंगोली येथे साहित्यिक, चित्रकार भ. मा. परसावळे यांच्या हस्ते रामलीला मैदनासमोरील फुटपाथवर शेतकरी बाजारचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी माजी शिक्षण अधिकारी शिवाजी पवार, झेंडू फुले अभियानचे प्रवर्तक अण्णा जगताप, शिवचरण रटाळकर, पांडुरंग गिरी आदींनी ५० रुपये किलो दराने झेंडूची खरेदी करावे, असे आवाहन केले. या वेळी ४ ते ५ क्विंटल फुलांची विक्री झाली, असे श्री. जगताप यांनी सांगितले.  परभणी येथे वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशव्दारासमोर किमान ५० रुपये प्रतिकिलो दराने झेंडू फुले विक्री अभियानचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी १ क्विंटलहून अधिक फुलांची विक्री झाली. या वेळी कृ.िषभूषण सोपानराव आवचार, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा. किरण सोनटक्के, डाॅ. रामेश्वर नाईक, डॅा. बी. एम. ठोंबरे, डॅा. आनंद गोरे कवी केशव खटिंग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रणजित कारेगांवकर, डाॉ. मारुती हुलसुरे, सुनील तुरुकमाने, माधव यादव, संतोष देशमुख, बबन आव्हाड आदींनी ५० रुपये किलो दराने झेंडूची फुले खरेदी करण्याचे आवाहन केले. 

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी हिंगोली येथे स्वतः १०० रुपये किलो दराने २० किलो झेंडूची खरेदी केली. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी ५० रुपये किलो दराने झेंडूची खरेदी करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर, पुणे, नाशिक आदी शहरातही या अभियानाला प्रतिसाद मिळाला, असे श्री. जगताप यांनी सांगितले. प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी सकाळी २५ रुपये दराने खरेदी केली. त्यामुळे दुपारी दोननंतर झेंडूचे दर ६० रुपये किलोपर्यंत पोचले. - संदीप भोसले, शेतकरी, चोंढी, ता. वसमत, जि. हिंगोली. परभणी शहरातील ग्राहकांनी सकाळी सात ते आठ किलो झेंडूची ५० रुपये दराने खरेदी केली. - सोपान सावंत, शेतकरी, बोरी सावंत, ता. वसमत, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com