मुक्ताईनगरात भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात

मुक्ताईनगरात भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात
मुक्ताईनगरात भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात

जळगाव ः राज्यातील दिग्गज नेत्यांमध्ये गणले जाणारे आणि मुक्ताईनगर (जि. जळगाव) विधानसभा मतदारसंघाचे सहा वेळेस प्रतिनिधित्व करणारे एकनाथ खडसे यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडील उमेदवारीसंबंधी अनिश्‍चितता आहे. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहे. याच वेळी घरकूल प्रकरणामुळे तब्बल साडेचार वर्षे कारागृहात राहिलेले शिवसेना नेते सुरेश जैन हेदेखील जळगाव शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. 

खडसे ४० वर्षे सक्रिय राजकारणात असून, एकही निवडणूक ते हरलेले नाहीत. जळगाव जिल्ह्यात जिल्हा सहकारी बॅंक, जिल्हा सहकारी दूध संघावर खडसे समर्थकांचे वर्चस्व आहे. या पंचवार्षिकमध्ये खडसेंकडे महसूल, कृषी आदी महत्त्वाची मंत्रिपदे होती. परंतु भोसरी येथील भूखंड खरेदी व इतर व्यवहारांसंबंधी आरोप झाल्यानंतर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांना अनेक प्रकरणांमध्ये क्‍लीन चिट मिळाली. परंतु मंत्रिमंडळात त्यांची नंतर वर्णी लागली नाही. 

अलीकडेच विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी आपल्यावर बाहेरच्या व्यक्तींनी केलेले आरोप व त्यामुळे झालेली राजकीय कारकीर्द यासंदर्भात भावनिक मुद्दे मांडले. शिवाय काय न्याय आहे या राज्यात, असा सवालही केला. ही सगळी पार्श्‍वभूमी लक्षात घेता भाजप मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांना उमेदवारी देणार नसल्याचे सांगितले जात असून, नवीन उमेदवाराचा शोध या मतदारसंघात सुरू झाला आहे. परंतु खडसे यांनी नुकतीच मुक्ताईनगरात आपल्या फार्म हाउसमध्ये भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची एक बैठक घेऊन आपणच उमेदवार असणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. यातच खडसे यांच्या परिवारातील व्यक्तीला भाजप उमेदवारी देणार आहे, असेही जिल्हा भाजपमध्ये सांगितले जाते. या सगळ्या स्थितीत जिल्हा भाजपमधील पदाधिकारी मात्र संभ्रमात आहेत. यातच मुक्ताईनगर मतदारसंघ महायुतीत आपल्याकडे खेचण्यासाठी जळगाव शिवसेनेतील काही पदाधिकारी सरसावले आहेत.

जैन अकराव्यांदा रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी उघड वैर घेणारे व नंतर घरकूल प्रकरणात कारागृहात जाऊन आलेले शिवसेना नेते सुरेश जैन हे जळगाव शहर मतदारसंघातून अकराव्यांदा निवडणूक लढणार आहे. सात पंचवार्षिक निवडणुका व दोन पोटनिवडणुका असे सलग नऊ वेळेस जैन या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. १० व्या निवडणुकीत जैन यांना भाजपचे सुरेश भोळे यांनी तब्बल ४० हजारांच्या मताधिक्‍याने पराभूत केले होते. कारागृहातून जैन यांनी ही निवडणूक लढविली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व पुन्हा शिवसेना, असा प्रवास जैन यांनी केला असून, राज्य मंत्रिमंडळात दोन वेळेस कॅबिनेट मंत्रिपदी त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. मध्यंतरी जैन यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु अलीकडेच कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेता जैन निवडणूक लढतील, असे जळगाव शहर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी नुकतेच म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com