प्लॅस्टिक अाच्छादन कपाशीत फायद्याचे

ठिबक सिंचनावर कपाशीचे पीक प्लॅस्टिक आच्छादनाच्या साहाय्याने घेतल्यानंतर उत्पादनात १८ ते २४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ दिसून आली आहे. शिवाय तण व्यवस्थापनासह एकात्मिक कीड नियंत्रणातही फायदा झाल्याचे निष्कर्ष दोन वर्षाच्या प्रात्यक्षिकातून दिसून आले आहेत. - डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद.
कापूस मल्चिंग
कापूस मल्चिंग

औरंगाबाद ः कपाशीत प्लॅस्टिक आच्छादनाचा केलेला उपयोग फायद्याचा ठरल्याचे पुढे आले आहे. कृषी विज्ञान केंद्राने औरंगाबाद जिल्ह्यातील तेरा शेतकऱ्यांच्या शेतावर दोन वर्ष घेतलेल्या प्रात्यक्षिकातून याविषयीच्या निष्कर्षाची नोंद घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयीच्या माहितीचे सादरीकरणही करण्यात आले. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याविषयीच्या तंत्रज्ञानाच्या शिफारशीचे आपल्या भागात फायदे तोटे तपासण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष तेरा शेतकऱ्यांच्या शेतावर औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दोन वर्षापासून बोरगाव अर्ज, मुधळवाडी, लाखेगाव या तीन गावात ठिबकच्या साहाय्याने मल्चिंगवर कपाशी पिकाचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर अर्धा एकरावर हे प्रात्यक्षिक घेताना त्यासोबतच अर्धा एकरावर मल्चिंगविना कपाशीचे पीक घेऊन त्यामधील खर्च व उत्पादनाचा ताळेबंद नोंदविण्यात आला. त्यानुसार २०१८-१९ च्या हंगामात ठिबकवर मल्टिंगविना अर्धा एकरात कपाशीची १५० सेमी बाय ३० सेमी अंतरावर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २३.८९ क्‍विंटल कापसाचे उत्पादन झाले. दुसरीकडे याच अंतरावर मल्चिंग व ठिबकच्या साहाय्याने लागवड केलेल्या कपाशीत हेक्‍टरी ३०.९३ क्‍विंटलचे उत्पादन झाल्याची नोंद घेतली गेली आहे. या प्रात्यक्षिकातून प्रचलीत पद्धतीपेक्षा मल्चिंगच्या साहाय्याने केलेल्या कपाशीच्या उत्पादनात २४ टक्‍के वाढ दिसून आली आहे. यंदाच्या प्रात्यक्षिकातून मल्चिंगविना ठिबकवर घेतलेल्या कपाशीचा हेक्‍टरी लागवड खर्च ३८ हजार ७०० रुपये तर उत्पन्न १ लाख २१ हजार ८८९ रुपये आले. यामध्ये निव्वळ नफा हेक्‍टरी ८३ हजार १३९ रुपये राहिला. दुसरीकडे ठिबक व मल्चिंगच्या साहाय्याने घेतलेल्या कपाशीचा हेक्‍टरी खर्च ४५२०० रुपये तर उत्पन्न हेक्‍टरी १ लाख ५७ हजार ७४३ रुपये मिळाले. ज्यामध्ये निव्वळ नफा १ लाख १२ हजार ५४३ रुपये राहिल्याची नोंद घेतली गेली आहे. सोबतच रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आल्यामुळे कीटकनाशकाचा सरासरी ५४६० रुपये प्रति हेक्‍टरी खर्चाची बचत झाल्याचीही नोंद घेतली गेल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने देण्यात आली.

प्रतिक्रिया मल्चिंगविना प्रचलित पद्धतीनुसार घेतलेल्या अर्धा एकरातील ठिबकविना घेतलेल्या शेतात तीन क्‍विंटल एकरी उत्पादन झाले. दुसरीकडे मल्चिंग व ड्रीपच्या साहाय्याने केलेल्या अर्धा एकरातील कपाशीत पाणी कमी असतानाही एकरी १२ क्‍विंटलपुढे उत्पादन आले. - निवृत्ती कागदे, शेतकरी लाखेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com