बहुपयोगी सूक्ष्म सिंचन प्रणाली

रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक किंवा तुषार सिंचन) पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. या पद्धतीमध्ये पाणी, वेळ आणि विजेची बचत होऊन अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड शक्य होते.
drip irrigation system
drip irrigation system

रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक किंवा तुषार सिंचन) पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. या पद्धतीमध्ये पाणी, वेळ आणि विजेची बचत होऊन अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड शक्य होते. रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक किंवा तुषार सिंचन) पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. या पद्धतीमध्ये पाणी, वेळ आणि विजेची बचत होऊन अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड शक्य होते. या पद्धतीद्वारे रात्रीच्या वेळी देखील पिकांस एकसमान पाणी देता येते. कमी पाण्यात अधिक क्षेत्र लागवडीखाली आणून उत्पादनवाढ मिळवण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती फायदेशीर ठरते. गादीवाफा पद्धतीमध्ये हवा, पाणी यांचे संतुलन योग्य राहून जमिनीमध्ये वाफसा कायम राखता येतो. या पद्धतीमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होतो. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादन वाढते. त्यासाठी लागवडीसाठी गादीवाफा, ठिबक सिंचन,प्लॅस्टिक आच्छादन, फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करावा. गादी वाफा पद्धती 

  • गहू, हरभरा, भुईमूग, कांदा या पिकांची लागवड करण्यासाठी ९० सेंमी रुंदीचा गादी वाफा तयार करावा. वाफ्याची उंची २५ ते ३० सेंमी असावी.
  • मका आणि बटाटा लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी व उंची २५ ते ३० सेंमी असावी.
  • गव्हाची पेरणी करताना दोन ओळीमध्ये २२.५ सेंमी अंतर ठेवावे. तर हरभऱ्यासाठी जातीनुसार दोन ओळींत ३० ते ४५ सेंमी आणि दोन रोपांमध्ये १० ते १५ सेमी अंतर ठेवावे.
  • मका, हरभऱ्याची टोकण पद्धतीने लागवड करावी. मका पिकासाठी २ ओळींमध्ये ३० ते ४० सेंमी आणि दोन रोपांमध्ये २० ते २५ सेंमी अंतर ठेवावे.
  • बटाट्याची लागवड दोन ओळींमध्ये ३० सेंमी तर दोन कंदामध्ये २० ते २५ अंतर ठेवून करावी.
  • कांदा पिकाची दोन ओळींत १० सेंमी आणि दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवून लागवड करावी. या पद्धतीमध्ये ९० सेंमी रुंदीच्या गादी वाफ्यावर नऊ ओळी लागतात.
  • भुईमुगाची टोकण पद्धतीने लागवड करावी. दोन ओळींमध्ये ३० सेंमी आणि दोन झाडांत १० सेंमी अंतर ठेवून लागवड करावी. किंवा दोन ओळींत २० सेंमी आणि दोन झाडांत २० सेंमी अंतर ठेवावे.
  • सूर्यफुलाची लागवड देखील ठिबक सिंचनावर करता येते. दोन ओळींमध्ये ४५ ते ५० सेंमी आणि दोन रोपांमध्ये २५ ते ३० सेंमी अंतर ठेवून लागवड करावी. गादी वाफ्यावर सूर्यफुलाच्या २ ओळी टोकण पद्धतीने लावाव्यात.
  • दोन गादी वाफ्यांमध्ये दीड ते दोन फूट रुंदीची सरी सोडावी. त्या सरीचा उपयोग गादी वाफ्यावरील तण काढण्यासाठी होतो. तसेच कीडनाशकाची फवारणी, रासायनिक खते देण्यासाठी सरीतून ये जा करता येते.
  • गादीवाफ्यावर पिकांची लागवड केल्यास पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. गादीवाफ्यांमध्ये ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करता येतो.
  • सूक्ष्म सिंचन पद्धती 

  • यामध्ये ठिबक आणि सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतींचा समावेश होतो. या दोन्ही पद्धतीमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे पाणी वापर कार्यक्षमता अधिक मिळते. पाटपाणी पद्धतीमध्ये हे शक्य होत नाही.
  • पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते. तसेच वेळ, वीज आणि मजूर खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, सूर्यफूल, बटाटा या पिकांसाठी या पद्धती अधिक फायदेशीर ठरतात.
  • ठिबक सिंचन 

  • पिकांची गादीवाफ्यावर लागवड करण्यापूर्वी इनलाईनची आखणी करावी. गादी वाफे वाफसा अवस्थेत आल्यानंतर लागवड करावी.
  • प्रत्येक गादी वाफ्याच्या मध्यभागी सरळ एक इनलाईन नळी ठेवून शेवटी खुंटीला बांधावी. म्हणजे इनलाईन नळी गादीवाफ्यावर सरळ राहील. त्यामुळे संपूर्ण वाफा वाफसा अवस्थेत ठेवण्यास मदत होते.
  • दोन इनलाईन नळ्यामध्ये ४.५ ते ५ फूट आणि दोन ड्रिपरमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार ३० ते ५० सेंमी अंतर ठेवावे. ड्रिपरचा प्रवाह जमिनीच्या प्रकारानुसार २.४ ते ४ लिटर प्रति तास इतका असावा.
  • मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करताना २ मायक्रो स्प्रिंकलरमध्ये ३ बाय ३ किंवा ४ बाय ४ मीटर अंतर ठेवावे. दोन मायक्रो स्प्रिंकलरमधील अंतर स्प्रिंकलर्सच्या प्रवाहानुसार ठेवावे.
  • ठिबक सिंचनातून विद्राव्य रासायनिक खते व्हेंचूरी किंवा फर्टिलायझर टॅंकमधून देता येतात. फर्टिगेशनमुळे खतांची कार्यक्षमता वाढून पिकांची जोमदार वाढ होते.
  • सूक्ष्म तुषार सिंचन पद्धत 

  • या सिंचन पद्धतीची बाजारात विविध प्रकारची मॉडेल उपलब्ध आहेत.
  • यामध्ये नेहमीच्या स्प्रिंकलरपेक्षा पाणी वापर कार्यक्षमता अधिक असते. त्यामुळे पाणी वापर कार्यक्षमता ८० ते ८५ टक्के मिळते. याचा उपयोग कांदा, भुईमूग, आले, हळद इत्यादी पिकांमध्ये देखील करता येतो.
  • या सिंचन पद्धतीचा १० बाय १० मीटर अंतर ठेवून वापर करावा.
  • सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा थेंब लहान असल्यामुळे जमीन टणक होत नाही.
  • बहुउपयोगी ठिबक सिंचन पद्धती  जवळच्या अंतराच्या पिकांसाठी इनलाईन ठिबकचा वापर फायदेशीर ठरतो. शासकीय अनुदानातून इनलाईन खरेदी करताना १२ मिमी, १६ मिमी, २० मिमी, व्यास आणि ड्रिपरचे अंतर ३० सेंमी, ४० सेंमी, ५० सेंमी, ६० सेंमी, ७५ सेंमी, ९० सेंमी, १०० सेंमी अंतरावर उपलब्ध आहेत. ड्रिपरचा प्रवाह ताशी २.४ लिटर आणि ४ लिटर मध्ये उपलब्ध आहेत.  

    दोन इनलाईन नळ्यांमध्ये ४.५ ते ५ फूट अंतरावर पिकांची लागवड 
    भाजीपाला टोमॅटो, ढोबळी मिरची, मिरची, वांगी, बटाटे, कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, काकडी, टरबूज, खरबूज, कारले, भोपळा इ.
    मसाला पिके आले, हळद
    नगदी पिके कापूस, ऊस
    तृणधान्ये गहू, मका, ज्वारी, बाजरी, भात
    तेलबिया भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, एरंडी, मोहरी इ.
    कडधान्य  हरभरा, तूर, वाटाणा
    फळपिके  केळी, पपई, स्ट्रॉबेरी

    संपर्क- बी.डी.जडे, ९४२२७७४९८१ (वरिष्ठ कृषी विद्या तज्ज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि..,जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com