मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाही

मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाही
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाही

नाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने सरकारने लिटरमागे पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला नाशिकमधील शेतकरी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला असून, १६ जुलैपासून या संघटना आंदोलनात उतरणार आहेत. मुंबई आणि गुजरातला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून एक थेंबही दूध जाऊ देणार नाही, असा इशारा या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेद्वारे दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६ जुलैपासून पुकारण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली. जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, किसान सभेचे राजू देसले, जिल्हा समन्वय समितीचे चंद्रकांत बनकर, हिरामण वाघ, सोमनाथ बोराडे, भास्कर शिंदे, नाना बच्छाव, नितीन रोटे, आदी उपस्थित होते.

वडघुले म्हणाले, ''गायींचे आणि शेतकऱ्यांचे आधार कार्ड एकमेकांना लिंक करून त्याआधारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट जमा करावे, अशी आमची मागणी आहे."

रक्त सांडेल, पण दूध सांडणार नाही... मुंबईला दूध घेऊन जाण्याचा कुणी प्रयत्न केल्यास रस्त्यावरच ही वाहने रोखण्यात येतील. दुधाचा थेंबही रस्त्यावर सांडू दिला जाणार नाही. बळाचा वापर करून, तसेच आंदोलन दडपून दूध मुंबईकडे पाठविण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांचे स्वत:चे रक्त सांडण्याची देखील तयारी असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दूध संघ आणि दूध संकलन केंद्रांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com