नांदेड, परभणी, हिंगोलीत हमीभावाने ४५०० क्विंटल मूग खरेदी

Mung bean purchase 4500 quintal in three district
Mung bean purchase 4500 quintal in three district

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९५६ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५९३ क्विंटल मूग खरेदी किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४५९ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अजून एकूण ४९७ शेतकऱ्यांचे २ कोटी ११ लाख ८१ हजार ४१० रुपये रकमेचे चुकारे येणेबाकी आहेत.

हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाच्या खरेदीसाठी यावर्षीच्या हंगामात अनेकदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी फारसा प्रतिसाद दिला नाही. या तीन जिल्ह्यांत एकूण ६ हजार १६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यामध्ये मुगासाठी ३ हजार ४२, उडदासाठी ३९५, सोयाबीनसाठी २ हजार ७२६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयअंतर्गत नाफेडच्या नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट या केंद्रांवर मिळून एकूण ४५९ शेतकऱ्यांनी आणि विदर्भ को-मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ४२ शेतकऱ्यांनी अशी एकूण ५१० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. फक्त मुखेड येथील केंद्रावर २९ शेतकऱ्यांचा १२५ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. उडिद, सोयाबीनची खरेदी निरंक आहे.

परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा येथील केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीनसाठी एकूण १ हजार ४४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ८२९ शेतकऱ्यांचा १ हजार ७७३.५० मूग खरेदी करण्यात आला. विदर्भ को-मार्केटिंग फेडरेशनच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रांवर मूग आणि सोयाबीनसाठी एकूण १ हजार ३७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३२२ शेतकऱ्यांचा १ हजार ९१७ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ६५१ शेतकऱ्यांचा ३ हजार ६९०.५० क्विंटल मूग खरेदी करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव येथील केंद्रांवर मूग, उडिद, सोयाबीनसाठी एकूण २ हजार ८४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार येथील केंद्रांवर २७६ शेतकऱ्यांच्या ७७७.५० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. डिसेंबरअखेर पर्यंत या तीन जिल्ह्यातील ८६६ शेतकऱ्यांच्या ४ हजार ५९३ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. हमीभावानुसार (प्रतिक्विंटल ७ हजार ५० रुपये) या मुगाची किंमत ३ कोटी २३ लाख ८० हजार ६५० रुपये एवढी होती. आजवर या तीन जिल्ह्यांतील एकूण ४५९ शेतकऱ्यांच्या १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपयांचे चुकारे अदा केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com