नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण पावसाअभावी बसतोय फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र वाढतेच आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी साधारण महिना ते दीड महिना पावसाचा खंड पडत आहे. त्यामुळे दरवर्षी अपेक्षित पाऊस नसल्याचा फटका मुगाला सोसावा लागत असल्याचे सुमारे दहा वर्षांतील चित्र आहे. यंदाही सरासरीच्या जवळपास चौपट म्हणजे ३८७.९७ टक्के क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे, मात्र गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस गायब झाल्याने त्याचा मोठा फटका बसला असून, उत्पादनात साधारण ६० टक्‍के घट झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात अकोले वगळता सर्वच तालुक्‍यांत मुगाचे क्षेत्र असले, तरी दुष्काळी असलेल्या पारनेरमध्ये १३ हजार ०३८ हेक्‍टरवर, तर नगर तालुक्‍यात १० हजार १०६ हेक्‍टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झालेली आहे. पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड तालुक्‍यांतही बऱ्यापैकी क्षेत्र आहे. जिल्ह्यात मुगाचे सरासरी क्षेत्र ९२५८ हेक्‍टर आहे. मात्र यंदा ३५ हजार ९१८ हेक्‍टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली होती. गेल्या दहा वर्षांचा विचार करता दुष्काळी असलेल्या २००९-१० व २०१३-१४, या दोन वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षी सरासरीच्या दुप्पट, तिप्पटच पेरणी झाली आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून नगर व पारनेर हे तालुके मुगाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. २०१६ -१७ मध्ये, तर मुगाचे या दोन तालुक्‍यांत मुबलक उत्पादन मिळाले होते. शेती अभ्यासकांच्या माहितीनुसार त्या वर्षी सुमारे २०० कोटी रुपयांची उलाढाल मुगातून झाली होती. त्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसातील खंड पंधरा दिवस होता. त्यामुळे त्या वर्षी फारसा परिणाम झाला नाही. त्या एका वर्षाचा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांपासून पेरणीनंतर मुगाला पाऊस नसल्याचा फटका बसतो आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला, तरच मुगाची पेरणी केली जाते.

यंदाही सुरवातीला झालेल्या पावसावर मुगाची पेरणी झाली. मात्र त्यानंतर दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे. यंदा पाऊस नसल्याचा खरिपातील सगळ्याच पिकांवर परिणाम झालेला आहे. मात्र सर्वाधिक फटका मुगाला बसला आहे. पाऊस पुरेसा नसल्याने मुगाला अपेक्षित शेंगा आलेल्या नाहीत. आलेल्या शेंगातील दाणे पोसले नाहीत. नेहमीच्या तुलनेत यंदा उत्पादन घटल्याचा अंदाज आहे.  

दहा वर्षांतील मुगाचे क्षेत्र (हेक्‍टर)
२००९-१० १६,७००
 २०१०-११ १८,७६६
२०११-१२ ३०,५९०
२०१२-१३ ४३००
२०१३-१४ २८,२२०
२०१४-१५  ५,१००
२०१५-१६  ३२,५००
२०१६-१७    ४७,९००
२०१७-१८ ४८,४००
२०१८-१९ ३५,९१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com