ओलिताबरोबरच कोरडवाहूसाठी मोहरी पीक फायद्याचे

महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील १० ते ३० अंश सेल्सिअस (ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी) तापमान या पिकास पोषक आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते.
Mustard crop
Mustard crop

महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील १० ते ३० अंश सेल्सिअस (ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी) तापमान या पिकास पोषक आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते. हे पीक साधारणत: दोन किंवा तीन ओलिताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन देते कमी पाण्यामध्ये, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते.  खरीप हंगामामध्ये झालेल्या पावसाचा खरीप पिकांसोबत रब्बी पिकांनाही फायदा मिळतो. रब्बी हंगामात मोहरीची वेळेवर पेरणी केल्यास जमिनीतील ओलाव्याचा फायदा घेता येईल. हे तेलबियातील महत्त्वाचे, कमी खर्चाचे पीक आहे. तेलबिया पिकाच्या उत्पादनामध्ये मोहरी या पिकाचा जगात व भारतात दुसरा क्रमांक लागतो. पूर्वी मोहरी हे प्रामुख्याने उत्तर भारतात घेतले जाणारे पीक होते. आजही या पिकाच्या एकूण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, उतर प्रदेश, हरियाना, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या सात राज्यांचा एकूण ९०% वाटा आहे. मात्र, अलीकडे बहुतांश भारतामध्ये हे पीक घेतले जाते. मोहरी तेलाचा वापर 

  • मोहरीच्या बियांमध्ये ३२ ते ४० % तेलाचे प्रमाण असते. उत्तर भारत आणि पश्चिम बंगाल येथे मोहरीचे तेलाचा वापर अधिक आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील स्वयंपाकात त्याचा फारसा वापर होत नाही. 
  • मोहरी बुरशीविरोधक असल्याने लोणची टिकवण्याकरिता व चवीसाठी लोणच्यामध्ये मोहरीची पूड घातली जाते. 
  • उत्तर आणि पूर्व भारतात मोहरीच्या तेलाचा खाण्याचे पदार्थ तयार करण्याकरिता उपयोग केला जातो.
  • मोहरीच्या कोवळ्या हिरव्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. त्यात मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम तसेच ‘अ’ आणि ‘क’ ही आवश्यक जीवनसत्वे असतात. पंजाबमध्ये मक्याच्या रोटीसोबत मोहरीच्या कोवळ्या पानाची भाजी विशेष आवडीने (मकेकी रोटी और सरसों का साग) खाल्ली जाते. 
  • मोहरीच्या ढेपेमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून दूध देणाऱ्या जनावरांकरिता उपयुक्त खाद्य मानले जाते.
  • महत्त्वाचे मुद्दे

  • या पिकाची योग्य वेळी पेरणी केली तर कीड आणि रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो.
  • या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्ष्यांपासून संरक्षणाची आवश्यकता नसते. 
  • मोहरी पीक मध्यम खोल जमीन किंवा खारवट जमिनीत घेऊ शकतो. 
  • तणग्रस्त जमिनीत या पिकाचे उत्पादन अन्य पिकांपेक्षा जास्त मिळते. 
  • पीक परिपक्व होत असताना झाडाची सर्व पाने जमिनीवर गळून पडतात. ते जमिनीत कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते. 
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी प्रती हेक्टरी १२ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असलेले टी. ए. एम. १०८-१ हे वाण विकसित केले आहे. 
  • या सर्व कारणामुळे मोहरी हे परंपरागत गहू, हरभरा पिकाच्या तुलनेत खर्च व नफा या दृष्टीने चांगले पर्यायी पीक ठरू शकते.
  • महाराष्ट्रात खरीप हंगामातील सोयाबीन पिकानंतर रब्बीमध्ये मोहरी पिकाची लागवड करता येईल. 
  • पूर्व विदर्भात खरिपात भात पिकाच्या लवकर येणाऱ्या जातीची लागवड केल्यानंतर रब्बीमध्ये मोहरी पिकाची लागवड करणे अधिक फायद्याचे ठरू शकते. 
  • परंपरागत सलग गहू पीक घेण्यापेक्षा गहू पिकामध्ये ९:१ किंवा ६:१ या प्रमाणात आंतरपीक घेणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते.
  • सुधारित तंत्रज्ञान व विद्यापीठाने वेळोवेळी केलेल्या शिफारशींचा अवलंब केल्यास मोहरी या पिकातून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळू शकते.
  • जमीन  मोहरी पिकाच्या दमदार वाढीच्या दृष्टीने मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. पाण्याचा चांगला निचरा करणारी जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. पूर्वमशागत 

  • खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन खोलवर नांगरून आडवी उभी वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. 
  • ओलिताखाली पीक घ्यावयाचे झाल्यास वखराच्या किंवा सारा यंत्राच्या साहाय्याने सारे पाडावेत. पाणी चांगले सम प्रमाणात देता येते. 
  • मोहरीचे सुधारित वाण व त्यांचे गुणधर्म     

    वाण  फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी (दिवस) परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस) १००० दाण्याचे वजन (ग्रॅम) दाण्याचा रंग हेक्टरी उत्पादन (क्विंटल) तेलाचे प्रमाण (% )
    टी. ए. एम.- १०८-१ ४० १०१     ५.०   काळसर करडा १०-१२ ४०
    शताब्दी (ए.सी.एन-९) ४०–४२ ९५-१०५ २.९-४.० करडा ८-१२ ३१-४०
    एनआरसीएचबी-१०१ ५१-५४ १०५-११५  ३.६-५.२  काळसर     ८-१० ३५-४०

    बियाण्याचे हेक्टरी प्रमाण   मोहरीच्या पेरणीकरिता साधारणत: ४ ते ५ किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे.  बीज प्रक्रिया  

  • पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम तीन ग्रॅम प्रति किलो लावावे. 
  • बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी पेरणीआधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे.
  • पेरणीची वेळ   पेरणी ऑक्‍टोबरचा शेवटचा पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणीची पद्धत

  • मोहरी या पिकाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. 
  • मोहरीचे बियाणे आकाराने लहान असल्यामुळे बियाण्याच्या आकाराची वाळू सम प्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी, त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात समप्रमाणात पडेल. बरेचसे शेतकरी हे सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खतांमध्ये मिसळून सुद्धा पेरणी करतात. 
  • बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणी साधारणत: ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. बियाणे ओल्यावर पडेल, अशा बेताने पेरावे. 
  • कोरडवाहू मोहरीची पेरणी जमिनीत ओल असताना आणि ओलीताखाली मोहरीच्या पेरणीकरिता पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वाफसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. 
  • ज्या भागात भात (धान) पीक घेतले जाते, त्या ठिकाणी खरिपातील पीक कापणीनंतर लगेच मोहरीची पेरणी केल्यास हे पीक चांगले येऊ शकते.  
  • आंतरपिके गव्हाबरोबर आंतरपीक ९:१ किंवा ६:१ या प्रमाणात ओलीमध्ये पेरणी केल्यास फायदेशीर ठरते.   विरळणी/खाडे भरणे   या पिकाच्या पेरणीनंतर १०-१२ दिवसांनी विरळणी करणे अत्यावश्यक आहे. साधारणत: दोन झाडातील अंतर १० ते १५ सें. मी. राहील अशा प्रकारे विरळणी किंवा खाडे भरणी करावी. शेतात हेक्टरी १.५ ते २.२ लाख रोपांची संख्या ठेवावी. दोन झाडातील अंतर १० ते १५ सेंमी असल्यास झाडांची चांगली वाढ होते. त्यातून अधिक उत्पादन मिळते. आंतरमशागत  मोहरी उगवणीनंतर ५० दिवसांच्या काळात पीक तण विरहित ठेवावे. मोहरी पिकातील  तण नियंत्रणासाठी पेरणीपासून २० व ४० दिवसांनी २ निंदण व दोन डवरणी कराव्यात.  ओलिताचे व्यवस्थापन 

  • निश्चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांच्या अंतराने ओलिताच्या तीन पाळ्या द्याव्या. 
  • दोनच ओलिताच्या पाळया देणे शक्य असल्यास पेरणीनंतर एक महिन्याने पहिली व पीक फुलावर असताना दुसरी पाण्याची पाळी द्यावी. 
  • एकच ओलित करणे शक्य असल्यास पीक फुलोऱ्यावर असताना ओलित करावे.
  • रासायनिक खतांचे व्यवस्थापन 

  • मोहरी हे पीक कोरडवाहू तसेच ओलिताची सोय उपलब्ध असल्यास ओलिताखाली सुद्धा घेऊ शकतो.
  • ओलिताखाली मोहरी पीक घेताना हेक्टरी ५० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद या रासायनिक खताची मात्रा द्यावी. हेक्टरी २५ किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद पेरणीच्या वेळेस आणि उरलेले २५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी म्हणजेच पहिल्या पाणी पाळीच्या वेळेस द्यावे. 
  • उत्पादन वाढीसाठी प्रती हेक्टरी २० किलो गंधक आणि १ किलो बोरॉन पेरणीच्या वेळीच द्यावे. -कोरडवाहू परिस्थितीत प्रति हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. कोरडवाहू मोहरीच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खत मात्रेसह ५० टक्के फुलोरा अवस्थेत युरिया (१ टक्का) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पिकावर फवारणी करावी.    
  • संपर्क-  डॉ. जीवन कतोरे, ८२७५४१२०१२ डॉ. संदीप कामडी, ९४२३४२१५६७ (अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, महाराज बाग, नागपूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com