‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेच

कांदा
कांदा

नाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच कांदा उत्पादकांना भाववाढीचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत तब्बल १३ कोटी रुपये खर्च करून १२ हजार टन कांदा खरेदी करण्यात आला; परंतु उर्वरित १३ हजार टन कांदा खरेदीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. कांदा साठवणुकीसाठी चाळीच उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला कांदा ठेवायचा कुठे, हा प्रश्न आता नाफेडसमोर निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात नगदी पीक असलेला उन्हाळ कांदा या सप्ताहात शंभर रुपयाने घसरला आहे. इतर राज्यातून दाखल होत असलेल्या लाल कांद्यामुळे उन्हाळ कांद्याला फटका बसला आहे. ७ व ८ आॅगस्ट रोजी विक्री झालेला ११४५ रुपयांचा कमाल भाव सोमवारी (ता.१३) लिलावात जाहीर झाला आहे. गेल्या काही महिन्यांत लाल कांदा दरात अनपेक्षितपणे तेजी आली; परंतु उन्हाळ कांदा या हंगामात एकदाही तेजीत आला नाही. त्यामुळे मोठे आर्थिक उत्पन्न मिळवण्याची आशा ठेवून जपून साठविलेला कांदा कमी दरात विक्री होत आहे.

कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून, केंद्राने केलेल्या उपाययोजनादेखील प्रभावी ठरल्या नाहीत. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य दर शून्य; तसेच कांदा निर्यात प्रोत्साहन पाच टक्के अनुदान असूनसुद्धा कांदा दर सुधारत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

वाहतूकदारांच्या या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला पाच ते सहा लाख क्विंटल कांदा चाळीत पडून होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या कांद्याची वाहतूक ठप्प असल्याने निर्यातीलासुद्धा या संपाचा फटका बसलेला होता. याशिवाय बदलत्या वातावरणाचा फटका चाळीत साठवलेल्या कांद्याला बसत असून, आज मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरेदी केलेला कांदा बाहेर न गेल्यामुळे निफाड उपआवारावरील लिलाव मागील सप्ताहात चार दिवस बंद राहिले होते.

महिनाभरात २५ टक्के घट ३ जुलैला सरासरी १३०१ रुपये प्रतिक्विंटल विकला जाणारा कांदा एक महिन्यानंतर हजार रुपयांच्या घरात आला आहे. जवळपास एका महिन्यात कांद्याच्या दरामध्ये २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. कांदा निर्यातीस चालना देण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातदारांकरिता निर्यात प्रोत्साहन योजना (एमइआयएस) अंतर्गत ५ टक्के अनुदान जाहीर केले; पण या अनुदान योजनेचा लाभ वाहतूकदारांनी मागील महिन्यात पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे निर्यातदारांना घेता आला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com