नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांची मुंबईत बदली

नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांची मुंबईत बदली
नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांची मुंबईत बदली

नगर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांची अखेर बुधवारी बदली करण्यात आली. मुंबई येथे इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळावर मुख्य अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ‘सिडको’चे सहव्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील ‘सीईओ’ म्हणून बदलून आले आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हे आदेश दिले. 

जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद सदस्यांनी आठ जुलैला माने यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणला होता. हा ठराव दाखल करण्यापूर्वी ‘सीईओं’ची बाजू ऐकून घेतली नसल्याचे कारण सांगत विभागीय आयुक्तांनी दोन ऑगस्टला याबाबत सुनावणी घेतली. नाशिक येथे झालेल्या सुनावणीला जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील गैरहजर होत्या. पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण सांगत, विखे यांनी सुनावणीपूर्वी दोन दिवस आयुक्तांसमोर आपले लेखी म्हणणे सादर केले होते. 

दरम्यान, वैद्यकीय रजा संपल्यानंतर माने पुन्हा जिल्हा परिषदेत हजर झाले. अविश्‍वास प्रकरणात आलेल्या या नाट्यमय वळणानंतर जिल्हा परिषद सदस्य जास्त आक्रमक झाले. गेल्या महिनाभरात झालेल्या कोणत्याच बैठकीला माने हजर राहत नव्हते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर हेच अधिकारी-पदाधिकाऱ्यांत दुवा होते. मासिक बैठकीतही या विषयावर बराच खल झाला. कोणताही सदस्य सीईओंकडे काम घेऊन जाणार नसल्याचे सांगत विखे यांच्यासह सदस्यांनी आक्रमक धोरण अवलंबिले. 

गेल्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी सीईओ प्रकरणावरून विभागप्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेतली. आता माने यांची बदली झाल्याने गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या वादावर पडदा पडणार आहे.

पदभार त्वरित सोडण्याचे आदेश  विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्यासमोर दोन ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी झाली होती. ते आठ ऑगस्टला निर्णय देणार होते. मात्र, तत्पूर्वीच हा बदली आदेश देण्यात आला. सामान्य प्रशासनाच्या अपर मुख्य सचिवांनी पाठविलेल्या बदली आदेशात माने यांनी नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश आहेत. विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्याचेही त्यात सुचविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com