कोरोनाला रोखण्यासाठी नगर जिल्हा प्रशासन सज्ज

City District Administration ready to block Corona
City District Administration ready to block Corona

नगर ः ‘‘जगभरात ‘कोरोना व्हायरस’ने धुमाकूळ घातला असला, तरी नगर जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण नाही. प्रशासनाने या आजाराचा मुकाबला करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांनी ‘कोरोना’ची धास्ती घेऊ नये. जिल्ह्याला सध्यातरी कोरोनाचा धोका नाही. सोशल मीडियावरील अफवांवर विश्‍वास ठेवू नका. विनाकारण अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू,’’ असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला. 

नगर येथे बुधवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोरोना’ आजाराबाबत आयोजित पत्रकार परिषदेत द्विवेदी बोलत होते. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाढे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, ‘‘नगरमधील एकाच कुटुंबातील चौघे दुबईतून एक मार्चला येथे आले. विशिष्ट देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे ‘स्क्रिनिंग’ विमानतळावर सुरू होते. त्यात दुबईचा समावेश नव्हता. त्यामुळे या चौघांची ‘स्क्रिनिंग’ झाली नाही. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्याविषयी नाहक चुकीचे संदेश पसरविले गेले. त्यांना ‘कोरोना’ची लागण झालेली नाही. प्रशासनानेही या चौघांची तपासणी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दक्षता घेण्याची सूचना केली. तसेच साबणाने नियमित हात धुणे महत्त्वाचे आहे,’’ असे द्विवेदी म्हणाले.

जिल्हा शासकीय रुग्णालय, बूथ हॉस्पिटल, शिर्डी व शिंगणापूर येथे दक्षता कक्ष स्थापन केले आहेत. एकूण ९५ बेडची व्यवस्था केली आहे. सध्या परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे ‘स्क्रिनिंग’ केले जात आहे. आगामी यात्रा, जत्रांच्या अनुषंगाने प्रांताधिकारी, तहसीलदारांना संबंधित देवस्थानांशी संपर्क साधून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे द्विवेदी म्हणाले. 

१०४ टोल-फ्री क्रमांक  जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे विशेष कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांसाठी १०४ टोल-फ्री क्रमांक आहे. कोरोनाविषयक शंका या क्रमांकावर विचारता येतील. हे कक्ष २४ तास कार्यरत असतील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरही कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

खबरदारीच्या उपाययोजना 

  • श्‍वसनाचा विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना काळजी घेणे. 
  • हात नियमित साबणाने स्वच्छ धुवावेत. 
  • शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा. 
  • अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. 
  • फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत. 
  • हस्तांदोलन टाळावे. 
  • चेहरा, नाकाला वारंवार हाताने स्पर्श करू नये. 
  • गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com