नगरमध्ये नव्या वर्षातही रंगणार निवडणुकांचा फड

Nagar district in Election fade will be held in the New Year
Nagar district in Election fade will be held in the New Year

नगर ः लोकसभा, विधानसभा निवडणुकांत हे वर्ष गेले. आता नवे वर्षही नगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीतच जाणार आहे. जिल्ह्यात आगामी वर्षात जिल्हा सहकारी बॅंक, ७६५ ग्रामपंचायती, आठ सहकारी साखर कारखाने, दहा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांना ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान असते. २०२० या वर्षातही निवडणुकांच्या वातावरणामध्ये राजकारणाच्याच चर्चांना उधाण येणार आहे. 

ग्रामीण भागातील शेतशिवारासाठी, आर्थिक प्रगतीसाठी मागील सहा दशकांच्या कारकिर्दीत जिल्हा सहकारी बॅंकेने दिलेले योगदान पथदर्शी आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बॅंक ग्रामीण भागातील प्रत्येक घराशी जोडलेली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाची मागील पंचवार्षिक निवडणूक मे २०१५ मध्ये झाली होती. आता एप्रिल २०२० मध्येच बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पुढील वर्षात नगर जिल्ह्यातील आठ कारखान्यांची संचालक मंडळे निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. नगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा जिल्हा मानला जातो. सहकारातील निवडणुका रंगतदार असल्याने चर्चेत असतात. जिल्ह्यात १४ बाजार समित्यांपैकी १० बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची उलाढाल मुख्यत्वे कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे केली जाते. 

विश्‍वसनीय पद्धतीने शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जाऊन त्यांच्या घामाचे दाम योग्य रितीने मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न समित्या अस्तित्वात आल्या. या समित्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य, हमाल-मापाडी व सेवा संस्थांतील चार मतदारसंघांसाठी मतदान होते. त्यातील मतदारांची संख्या मोजकी असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली, अर्थात जिल्हा निवडणूक शाखेमार्फत या निवडणुका पार पडतील.

मतदारयादीत आता नव्याने शेतकऱ्यांचाही समावेश असणार आहे. जिल्ह्यात १६०२ गावे आहेत. नव्याने चार ग्रामपंचायती अस्तित्वात आल्याने, ग्रामपंचायतींची संख्या १३१६ पर्यंत वाढली आहे. पुढील वर्षी मुदत संपणाऱ्या ७६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. ‘नवे गडी नवे राज्य’ स्थापन करण्यासाठी गावकारभारी लवकरच कामाला लागणार आहेत. टप्प्याटप्प्याने या निवडणुका पार पडणार आहेत. जिल्हा सहकारी बॅंक संचालक मंडळाची मुदत संपण्याचा कालावधी ५ मे २०२० आहे. त्यानंतर बॅंकेचीही निवडणूक होणार आहे. 

नेत्यांचाही लागणार कस  नगर जिल्ह्यामध्ये जामखेड, कर्जत, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव या दहा बाजार समित्यांच्या निवडणुका नव्या वर्षात होत आहेत. तालुका आणि जिल्हा पातळीवर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना बाजार समितीच्या राजकारणात मोठा रस असतो. राज्यात पक्षीय राजकारणातून सत्ता बदल झाला. त्याचा परिणाम आता थेट बाजार समितीच्या निवडणुकीवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून वरच्या पातळीवरील राजकारणाला महत्त्व आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता येण्यासाठी थेट नेत्यांचा सहभाग असतो. त्यामुळे आता सर्वपक्षीय नेत्यांचा बाजार समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकात कस लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com