लोकसभा निवडणुक
लोकसभा निवडणुक

नगरची लढत राहणार लक्षवेधी

नगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार जाहीर झाल्याने आता संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे पाटील या दोन तगड्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढतींपैकी एक असलेल्या नगरकडेही राज्याचे लक्ष राहणार आहे.  राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांतील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघातून लढण्याची वर्षापासून तयारी केली आहे. मात्र आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने डॉ. विखे यांची अडचण झाली. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गुरुवारी भाजपच्या पहिल्या यादीत डॉ. सुजय यांना उमेदवारी जाहीर झाली, तर राष्ट्रवादीकडून नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन तगडे उमेदवार समोरासमोर आले असून, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यापेक्षाही आमदार संग्राम जगताप विरुद्ध डॉ. सुजय विखे पाटील अशी, दोन युवा नेत्यांत सरळ लढत होणार आहे. राज्यातील प्रमुख लढतीपैकी ही एक लक्षवेधी लढत असेल, असे जाणकारांचे मत आहे. आमदार संग्राम जगताप नगर शहराचे आमदार असून, वडील अरुणकाका जगताप हे विधान परिषदेचे आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे आमदार आहेत. नगरसेवक, महापौर पदावर काम केल्यामुळे तरुणांची फळी त्यांच्यासोबत आहे. शिवाय मतदारसंघातील श्रीगोंदा तालुक्यात त्यांचे गाव असल्याने तेथेही मोठे प्राबल्य आहे.  डॉ. सुजय विखे पाटील स्वतः उच्चशिक्षित असून, विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. विखे यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे.  विखे यांच्या बैठका विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोणाचाही प्रचार करणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र गेल्या चार दिवसांत पाथर्डी, श्रीगोंद्यासह काही भागांत विखे यांनी बैठका घेतल्या. त्यांच्यासोबत कॉँग्रसचे बरेच नेते होते. त्यामुळे राज्यात कॉँग्रेस-राष्टवादीची आघाडी असली तरी, येथील कॉँग्रेसचे नेते काय करतात याकडेही लोकांचे लक्ष लागले आहे. आमदार कर्डिलेंची भूमिका महत्त्वाची...!  नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपच्या मंडपात आणण्यात आमदार शिवाजी कर्डिले यांची महत्त्वाची भूमिका होती. आता राष्ट्रवादीतर्फे कर्डिले यांचेच जावई आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी घोषित केल्याने कर्डिले यांची पंचाईत होईल, असे मानले जात आहे. त्यात नगरमधून मताधिक्‍य मिळविणाऱ्या उमेदवाराची मदार कर्डिले यांच्या भूमिकेवर असेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com