कर्जमाफी, यवतमाळ विषबाधा, बोंडअळीप्रश्नी सरकारची कसोटी

कर्जमाफी, यवतमाळ विषबाधा, बोंडअळीप्रश्नी सरकारची कसोटी
कर्जमाफी, यवतमाळ विषबाधा, बोंडअळीप्रश्नी सरकारची कसोटी

नागपूर : ऑनलाइन कर्जमाफीतील घोळ, पाच महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकरी, बोंडअळीने विदर्भ-मराठवाडा आणि खानदेशात झालेली तब्बल पंधरा हजार कोटींची हानी, यवतमाळ व परिसरातील शेतकऱ्यांचे विषारी मृत्यू, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसह समाजातील सर्वच घटकांत असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर आजपासून (ता. ११) नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे सर्व शेतकरीप्रश्न ॲग्रोवनमधून सातत्याने मांडले जात आहेत.

फडणवीस सरकारने 24 जून 2017 रोजी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर 18 आक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, कर्जमाफीच्या प्रक्रियेत ऑनलाइनचा मोठा घोळ समोर आला. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांमध्येही गोंधळाची स्थिती आहे. अद्यापही बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. याला वाढत्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचा मुद्दा जोडून विरोधक राज्य सरकारची कोंडी करणार हे स्पष्ट आहे.

बोंडअळीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार किमान वीस लाख हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी विरोधकांकडून होणार आहे. यवतमाळ आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे कीटकनाशकांमुळे मृत्यू झाले आहेत. या प्रकरणावर नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने नुकताच राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. या दुर्घटनेचेही पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे. निकृष्ट बियाण्यांच्या मुद्यावर विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा अंदाज आहे.

त्याचबरोच गुजरात विधानसभा निवडणुकीचे राजकीय सावट अधिवेशनाच्या कामकाजावर उमटणार आहे. राज्यातील भाजप आणि काँग्रेसचे नेते गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या मोहिमेवर आहेत. गुजरात निवडणुकीचा दुसरा आणि शेवटचा टप्पा 14 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 18 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. गुजरातची निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जे निकाल येतील त्याचे पडसाद विधिमंडळात पडण्याची शक्यता आहे.

पहिला आठवडा ठरणार वादळी गेल्या तीन वर्षात राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप लावत काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. शेतकरी, शेतमजूर आदींच्या प्रश्नावर आक्रमक होत दोन्ही काँग्रेसने राज्यभरात भाजपविरोधात वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. १२) दोन्ही काँग्रेसचा संयुक्त मोर्चा अधिवेशनावर धडकणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात हे मुद्दे गाजणार

  • यवतमाळमधील कीटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांचे मृत्यू
  • कपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या
  • नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com