नागपुरी संत्र्याची होणार दुबईला निर्यात

Nagpuri Orange
Nagpuri Orange

अमरावती : शासन, प्रशासन आणि संस्थात्मकस्तरावर संत्रा निर्यातीचा अपेक्षित पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे या सर्वांच्या सहभाग आणि मदतीशिवाय आता संत्रा उत्पादकांनीच थेट निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आणि राज्यात दिशादर्शक ठरू पाहणारी ही संत्रा निर्यात याच महिन्यात २० ते २२ जानेवारी दरम्यान होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.  राज्यात द्राक्ष, आंब्याची निर्यात होते. परंतु, अपेक्षित राजाश्रय न मिळाल्याने आणि स्थानिक नेतृत्वाच्या उदासिनतेमुळे संत्रा मात्र निर्यातीच्या बाबतीत पिछाडला. राजकीयच नाही तर प्रशासकीय पातळीवर देखील संत्रा उत्पादकांना ही अनास्था भोगावी लागली. संत्रा निर्यात होणारच नाही हे अपेक्षित धरून अपेडाकडून देखील ‘सिट्रसनेट’ हा गेटवेदेखील इतकी वर्ष सुरू करण्यात आला नव्हता. सगळीकडून अशाप्रकारे नैराश्‍य होते.  दरम्यान, संत्रा उत्पादकांची ही घुसमट लक्षात घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भाने पाठपुरावा केला.  वित्त मंत्रालय तसेच अपेडास्तरावर पाठपुरावा करीत त्यांनी ‘सिट्रसनेट’ हा गेटवे सुरू करण्यास बाध्य केले. एवढ्यावरच न थांबता अपेडाच्या माध्यमातून निर्यातीकरिता पूरक सुविधांच्या उपलब्धतेसाठीही पाठपुरावा चालविला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच संत्रा निर्यातीच्या हालचालींना वेग आला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी देखील निर्यातीला प्रोत्साहन देण्याकरिता सातत्याने याविषयांवरील कार्यशाळांवर भर दिला आहे. 

पहिला कंटेनर जाणार दुबईला ना नफा ना तोटा तत्त्वावर संत्र्याचा १७ टन क्षमतेचा एक कंटेनर दुबईला पाठविण्यासाठी एका स्थानिक निर्यातदाराने संमती दर्शविली आहे. ५० शेतकरी आपल्याकडे उपलब्ध निर्यातक्षम संत्रा याकरिता देतील. त्यासाठीच्या खर्चाचा भार शेतकरी स्वतःच उचलणार आहेत. अमरावती व नागपूर जिल्ह्यांतील शेतकरी यात सहभागी होणार आहेत. २० ते २२ जानेवारी या कालावधीत संत्र्याची खेप रवाना होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. अपेडाची मदत या उपक्रमासाठी घेण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. वाराणसीतून अशाच प्रकारे मिरची निर्यातीचा उद्देश साधण्यात शेतकऱ्यांना यापूर्वी यश आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com