बदनामीसाठी अहवालात नाव टाकले : विकास पाटील

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या वैरण विकास कार्यक्रमात झालेल्या कथित घोटाळ्याबाबत कोकणच्या कृषी सहसंचालकांनी कृषी आयुक्तांसमोर बाजू मांडली.
बदनामीसाठी अहवालात नाव टाकले : विकास पाटील
बदनामीसाठी अहवालात नाव टाकले : विकास पाटील

पुणे: राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या वैरण विकास कार्यक्रमात झालेल्या कथित घोटाळ्याबाबत कोकणच्या कृषी सहसंचालकांनी कृषी आयुक्तांसमोर बाजू मांडली. ‘‘मला बदनाम करण्यासाठी शिसोदे अहवालात नाव गोवले गेले आहे,’’ असा दावा सहसंचालक विकास पाटील यांनी केला आहे.  वैरण विकास कार्यक्रमात ४० लाखाचा घोटाळा झाल्याचा अहवाल कृषी खात्याचे तत्कालीन सहसंचालक नारायणराव शिसोदे यांनी सादर केला होता. त्यात काही अधिकाऱ्यांची नावे होती. मात्र, पाटील यांनी पुढे येत अहवालातील मुख्य बाबी माझ्याशी संबंधित आहे. त्यामुळे मी स्वतःहून काही बाजू मांडतो आहे, असे सांगत आयुक्तांना एक पत्र दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यपूर्ण वळण मिळाले आहे.  ‘‘या प्रकरणातील मुख्य तक्रारदार विलास यादव यांनी चुकीचे मुद्दे मांडले आहेत. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात देखील त्यांनी बिनबुडाची तक्रार केली होती. मुळात तत्कालीन आयुक्त उमाकांत दांगट, विकास देशमुख यांच्यासमोर या प्रकरणाची बाजू मांडली गेली होती. कोणताही गैरव्यवहार नसल्याने प्रकरण नस्तीबध्द झालेले होते. आता मला बदनाम करून पदोन्नती रोखण्यासाठीच पुन्हा प्रकरण बाहेर आणले गेले आहे,’’ असे सहसंचालकांचे म्हणणे आहे.  ‘‘चारा प्रकल्प १२ हजार ५०० हेक्टरऐवजी मी तेव्हड्याच रकमेत २१ हजार ६३७ हेक्टरवर राबविला. उलट शासकीय निधीची बचत केली. डीएचएन ६ वाणाची गवत लागवड दहा गुंठ्यांवर केल्यानंतर त्यातून प्रत्यक्षात तीन वर्षात ४५० टन प्रतिहेक्टरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले आहे. त्यामुळे फक्त दहा गुंठ्यावर योजना राबविली, असा निष्कर्ष चुकीचा निघतो. शेतकऱ्यांना दिलेल्या निविष्ठा देखील उत्तम होत्या,’’ असेही सहसंचालकांनी आयुक्तांना कळविले आहे.   चारा प्रकल्पातील कामकाजाची पाहणी तत्कालीन कृषी सचिव सुधीरकुमार गोयल यांनी केली होती. त्यामुळे शासनाची दिशाभूल करणारा अहवाल दिला गेला. त्यामुळे या प्रकरणी उपस्थित होणाऱ्या तक्रारींची अजिबात दखल घेऊ नये, असा युक्तिवाद सहसंचालकांनी केला आहे. पाटील यांनी काही मुद्दे स्वतःहून मांडलेले आहेत. मात्र, शिसोदे अहवालातील दोषी अधिकारी नेमके कोण आहेत की हा अहवालच बनावट आहे, हे आयुक्तालयाने अजून स्पष्ट केलेले नाही.

संचालकपदाची पदोन्नती रोखण्यासाठी डाव  कृषी आयुक्तालयात सध्या संचालकपदाच्या पदोन्नतीच्या फायली हाताळल्या जात आहेत. अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या एका सहसंचालकाला पदोन्नती देण्याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, सदर सहसंचालकाला पडद्याआड ठेवत चारा घोटाळ्याच्या नावाखाली पाटील यांचा बळी देण्याचा प्रकार सुरू असल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. पदोन्नतीच्या स्पर्धेतून आपण बाद होत असल्याचे पाहून एका नाराज अधिकाऱ्याने मुद्दाम फायली उकरून काढल्या. मात्र, खऱ्या घोटाळेबाजाचे प्रकरण पुढे न आणता आयुक्तांकडे फक्त पाटील यांचे नाव पाठवले गेले, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com