विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध

nana patole
nana patole

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना पटोले यांची रविवारी (ता.१) बिनविरोध निवड झाली. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले बिनविरोध निवडून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले; तर भाजपकडून किसन कथोरे यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. ‘‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यादृष्टीने सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस आणि मी यांनी चर्चा केली. विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे, ती कायम राहावी,  यासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला,’’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  नाना पटोले यांचा परिचय साकोली तालुक्‍यातील सुकळी येथे शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा जन्म ५ जून १९६३ मध्ये झाला. विद्यार्थिदशेपासूनच ते नानाभाऊ म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. विद्यार्थी संघटनेत काम करीत असताना १९९० मध्ये सानगडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढविली. यात ते विजयी झाले. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.  १९९९ व २००४ मध्ये काँग्रेसने लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. यात त्यांनी विजय मिळविला. मात्र, आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दावर तत्कालीन काँग्रेस पक्ष गंभीर नसल्याचे कारण समोर करून २००८ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दरम्यानच्या काळात ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून २००९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला.  जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपकडून विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी सुमारे दीड लाख मताधिक्‍याने पराभव केला. आठ डिसेंबर २०१७ ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येयधोरणांवर नाराज होत लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूरमधून भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढविली. यात ते पराभूत झाले, मात्र त्यांनी चांगलीच चुरस निर्माण केली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत साकोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा पराभव करून त्यांनी विजय खेचून आणला.  विशेष म्हणजे त्यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी साकोलीत सभा घेतली होती. त्यामुळे त्यांच्या या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. एक वेळ खासदार राहिलेले नाना पटोले या वेळी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com