कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात पीकहानी क्षेत्रात ६२ हजार हेक्टरने वाढ
वैयक्तिक पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पीकहानीच्या क्षेत्रात बदल होऊ शकतो. त्यानंतरच अंतिम क्षेत्र निश्चित होईल.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
नांदेड : ‘‘जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पीकहानी क्षेत्रात ६२ हजार २८० हेक्टरने वाढ झाली आहे. सुधारित अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ५२५ गावांतील ५ लाख ८६ हजार २९९ शेतकऱ्यांच्या एकूण ४ लाख ७३ हजार ६५५ हेक्टरवरील जिरायती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले आहे’’, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितली.
ऑक्टोबरमधील पावसामुळे जिल्ह्यातील ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सुरवातीला काढण्यात आला होता. त्यानंतर सुधारित प्राथमिक अंदाज काढण्यात आला. त्यानुसार पीकहानी क्षेत्रात ६२ हजार २८० हेक्टरने वाढ झाली. एकूण पीकहानी ४ लाख ७३ हजार ६५५ हेक्टरपर्यंत वाढले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या संख्येत ४२ हजार ७३६ ने वाढ झाली. त्यामुळे एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ४३ हजार ५६३ वरून ५ लाख ८६ हजार २९९ पर्यंत वाढली. तर, गावांच्या संख्येत ३५ ने वाढ झाली. ती आता १ हजार ४९० वरून १ हजार ५२५ एवढी झाली आहे.
नुकसानग्रस्त सोयाबीनच्या क्षेत्रात ३५ हजार ७६० हेक्टरने वाढ झाली. त्यामुळे सोयाबीनचे नुकसानक्षेत्र २ लाख ७७ हजार २५८ हेक्टर झाले आहे. कपाशीच्या नुकसान क्षेत्रात २९ हजार १८ हेक्टरची वाढ झाली. बाधित क्षेत्र १ लाख १७ हजार १९४ हेक्टरवरून १ लाख ४६ हजार २१४ हेक्टरपर्यंत वाढ झाली.
ज्वारीच्या नुकसान क्षेत्रात ९९३ हेक्टरने वाढ झाली. बाधित क्षेत्र २२ हजार १२४ हेक्टरवरून २३ हजार ११७ हेक्टरपर्यंत वाढले आहे. तुरीच्या नुकसान क्षेत्रात १ हजार ७५० हेक्टरने वाढ झाली. हे क्षेत्र ६ हजार ६ हेक्टरवरून ७ हजार ७५६ हेक्टरपर्यंत वाढले आहे. इतर पिकांचे १८ हजार ९०१ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. यात ४ लाख ७३ हजार २४६ हेक्टरवरील जिरायती पिके आणि ४०९ हेक्टरवरील बागायती पिकांचा समावेश आहे.