नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सव्वासात लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातही सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्राची व्याप्ती समजेल. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,नांदेड. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विमा भरपाई सोबतच शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. - चंद्रकांत नवघरे, आमदार, वसमत, जि. हिंगोली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशीचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट परतावा मंजूर करावा. रब्बी पेरणीची वेळ असल्यामुळे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर येऊन नुकसानीची माहिती घ्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय कमी होईल. शिवाय पंचनाम्याचे काम होईल. - माणिकराव सूर्यवंशी, शेतकरी, सिंगणापूर, जि. परभणी. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशीचे खूप नुकसान झाले आहे. अजून पंचनामे सुरू नाहीत. महसूल, कृषी विभागासोबत विमा कंपनीचे प्रतिनिधीदेखील नुकसानीची तक्रार घेण्यास तयार नाहीत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. - ज्ञानेश्वर माटे, शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सव्वासात लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सव्वासात लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सुमारे ७ लाख २५ हजारांवर हेक्टरवरील खरीप पिके, भाजीपाला पिके, फळपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीच्या क्षेत्राची व्याप्ती समजू शकेल. विमा संरक्षित शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीची माहिती संकलित केली जात आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी थेट बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई, भरीव आर्थिक मदत देण्याची गरज आहे. पंचनाम्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

या तीन जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात १६ लाख ६१ हजार ५० हेक्टरवर पेरणी झाली. त्यातील एकूण पेरणी क्षेत्रामध्ये एकट्या सोयाबीनचे क्षेत्र अर्ध्याहून अधिक म्हणजे ८ लाख ६३ हजार ६९ हेक्टर (५१.९४) टक्के आहे. त्याखालोखाल कपाशीची ४ लाख ८५ हजार ७८६ हेक्टरवर लागवड आहे. उर्वरित तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, भात, तीळ, कारळ या पिकांचा समावेश आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यातही ऑक्टोबरमध्ये पावसाने कहर केला. सततच्या पावसात भिजल्याने काढणीस आलेले, कापणी करून शेतामध्ये ठेवलेले सोयाबीन, वेचणी आलेल्या कापूस, कणसातील ज्वारी, यांसह विविध प्रकारच्या भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. मळणी न झालेल्या सोयाबीनचे सर्वाधिक ६० ते ६५ टक्के क्षेत्रावरील नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

कपाशीची अंदाजे २५ ते ३० टक्के बोंडे फुटली आहेत. त्यामुळे एकरी ३ ते ४ क्विंटलपर्यंत कापसाचे भिजून नुकसान झाले. ओढे, नाले, नद्यांच्या पुरात काढणी केलेली उभी पिके वाहून गेली. सततच्या पावसात भिजल्यामुळे सोयाबीन, बोंडे फुटलेल्या कापसातील सरकीला मोड फुटले आहेत. उभ्या ज्वारीच्या कणसाला मोड फुटले आहे. सर्वाधिक नुकसान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे झाले. व्यापारी डागील शेतीमालाची दर पाडून खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुट्ट्यांमुळे तसेच पाऊस सुरू असल्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अडचणी येत आहेत.  या तीन जिल्ह्यातील अनेक नवनिर्वाचित आमदार तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई, भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केली. रब्बी पेरणीची वेळ असल्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील प्रमुख पिकांचे अंदाजित बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र  बाधित क्षेत्र
सोयाबीन  ८६३०६९ ५४३४४४
कापूस  ४८५७८६ ११०४४६
तूर  १५२४५१ ३०४४९
ज्वारी  ४५७९८ ४१२१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com