नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावाने ६६ हजारांवर क्विंटल तुरीची खरेदी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २३ खरेदी केंद्रांवर शुक्रवार(ता. २०)पर्यंत एकूण ९ हजार १६४ शेतकऱ्यांची ६६ हजार ७२ क्विंटल एवढ्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
Nanded, Parbhani and Hingoli Districts with guaranteed purchase of tour 66 thousand quintal
Nanded, Parbhani and Hingoli Districts with guaranteed purchase of tour 66 thousand quintal

नांदेड : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ अंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २३ खरेदी केंद्रांवर शुक्रवार(ता. २०)पर्यंत एकूण ९ हजार १६४ शेतकऱ्यांची ६६ हजार ७२ क्विंटल एवढ्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक केंद्रावरून दररोज ५ ते १० शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे तूर खरेदीची गती काहीशी मंदावली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत नांदेड, हदगाव, किनवट, मुखेड येथील केंद्रावर आणि विदर्भ सहकारी महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगाव येथील केंद्रावर तूर खरेदी केली जात आहे. जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत ८ हजार ७८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शुक्रवार (ता. २०) पर्यंत २ हजार २३४ शेतकऱ्यांची ९ हजार ९१९.९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, असे जिल्हा विपणन अधिकारी सुधीर पाटील यांनी  सांगितले. 

जिल्ह्यात विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे १ हजार ५३४ शेतकऱ्यांची ७ हजार ५८९.५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत जिल्हा पणन अधिकारी कार्यालयातर्फे परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या सात केंद्रावर मिळून एकूण २२ हजार ४३४ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव, साखरा येथील केंद्रांवर मिळून एकूण १३ हजार ९४७ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. 

पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत परभणी जिल्ह्यात १ हजार २८५ शेतकऱ्यांची ११ हजार ८८३.५७ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यात २ हजार ३९७ शेतकऱ्यांची २३ हजार ५७५.९० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असे जिल्हा विपणन अधिकारी मिलिंद कापुरे यांनी सांगितले. विदर्भ सहकारी महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर मिळून एकूण १ हजार ७१४ शेतकऱ्यांची १३ हजार १०४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

खुल्या बाजारातील तुरीचे दर कमी आहेत. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर तूर विक्री करण्यासाठी तीन जिल्ह्यांतील ३५ हजारांवर शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आजवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ८० ते ९० शेतकऱ्यांना दररोज एसएमएस पाठवून खरेदी केंद्रांवर तूर आणण्यास सांगितले जात असे, परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावरून दररोज ५ ते १० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले 

हरभरा विक्रीसाठी चार हजारांवर नोंदणी

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. या तीन जिल्ह्यांत ४ हजार १२२ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. हरभऱ्याची उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. पुढील महिन्यात खरेदी सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय हमीभाव तूर खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

जिल्हा  तूर खरेदी शेतकरी संख्या
नांदेड १७५०९.४५ ३७६८
परभणी  २४९८७.५७ २९९९
हिंगोली २३५७५.९०  २३९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com