पावसाचा खंड त्यात किडींनी काढले डोके वर

पावसाचा खंड त्यात किडींनी काढले डोके वर
पावसाचा खंड त्यात किडींनी काढले डोके वर

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. वाढीसाठी पोषक वातावरणामुळे विविध प्रकाराच्या किडींनी डोके वर काढले आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्राद्रुर्भावाची व्याप्ती वाढत चाललेली असताना मूग, सोयाबीन आदी पिकांवर देखील विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जून महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात मात्र बहुतांश भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक तालुक्यात १५ ते २० दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. अजून काही दिवस पाऊस येण्याचा अंदाज नसल्याने खंडाचा कालावधी दीर्घ राहू शकतो. पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्या आहेत. विविध किडींच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. किटकांच्या नर- मादी पतंगाचे मिलन होऊन अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांची संख्या वाढत चालली आहे. कपाशीचे पीक पाते, फुले तसेच बोंडे भरण्याच्या अवस्थेत आहे. अनेक तालुक्यात गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे.

मावा, तुडतुडे फुलकिडे आदी रसशोषण करणाऱ्या किडींचा प्राद्रुर्भाव देखील आढळून आला आहे. सोयाबीनचे पीक वाढीच्या तसेच फुलोरा अवस्थेत आहे. हलक्या, बरड जमिनीवरील तसेच पाऊस कमी पाऊस झालेल्या भारी जमिनीवरील पिके दुपारच्या उन्हात सुकून जात आहेत. सोयाबीनवर शेंडे, पाने खाणारी अळी, चक्री भुंगा आदी किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.

कपाशीवर बोंड अळी तर मुगावर रसशोषक किडी दिसत आहे. - बाळासाहेब रनेर, शेतकरी, बाभळगाव, जि. परभणी

यंदा बोंड अळी लवकर आली आहे. पाण्याचा ताण बसला आहे. - गुलाबराव मुंढे, शेतकरी, केळी, जि. हिंगोली

किडींमुळे शेतकरी भांबावून गेले असून चिंतातूर झाले आहेत. - गोपाळ पाटील, इजळी, जि. नांदेड.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जात आहे. वेळीच उपाययोजना केलेल्यांना चांगले परिणाम दिसत आहेत. किडी धूऊन जाण्यासाठी पावसाची गरज आहे. - डॉ. पी. एस. झंवर, कीटकशास्त्र विभाग प्रमुख, वनामकृवि, परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com