नांदेड, परभणी, हिंगोलीत दीड हजार एकरांवर नवीन तुती

नांदेड, परभणी, हिंगोलीत दीड हजार एकरांवर नवीन तुती
नांदेड, परभणी, हिंगोलीत दीड हजार एकरांवर नवीन तुती

परभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत यंदा एकूण १ हजार ५९० एकरांवर नवीन तुती लागवड झाली आहे. त्यामुळे आता या तीन जिल्ह्यांत जुनी आणि नवी मिळून तुतीचे एकूण क्षेत्र २ हजार ६८३ एकर झाले आहे. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत असल्याने अंडीपुंजांची गरज वाढली आहे. अंडीपुंजाचा तुटवडा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांसाठी परभणी येथे स्वतंत्र रेशीम किटक अंडीपुंज निर्मिती केंद्र सुरू करण्याची गरज आहे.

सततच्या दुष्काळीस्थितीमुळे नांदेड, परभणी जिल्ह्यांतील शेतकरी महिन्याकाठी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेती व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे दरवर्षी तुती लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. या तीन जिल्ह्यांत गतवर्षीपर्यंत तुतीचे क्षेत्र १ हजार ९० एकर होते. यंदा १ हजार ५९० एकरांवर नवीन तुती लागवड झाल्यामुळे तुतीचे एकूण क्षेत्र २ हजार ६८३ एकरांपर्यंत वाढले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा या तालुक्यांतील शेतकरी रेशीम शेती करत आहेत. जिल्ह्यात या आधी २७० शेतकऱ्यांनी ३११ एकरांवर तुती लागवड केलेली आहे. २०१८-१९ मध्ये ४१६ शेतकऱ्यांनी ५२२ एकरांवर नवीन तुती लागवड केली आहे. त्यामुळे आता एकूण ६८६ शेतकऱ्यांकडे ८३३ एकरांवर तुती लागवड झालेली आहे. कोष उत्पादन सुरू केलेल्या शेतकऱ्यांनी आॅक्टोबरअखेरपर्यंत ६६५.७५ क्विंटल कोष उत्पादन घेतले आहे. २०१८-१९ मध्ये ८०० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट आहे.

परभणी जिल्ह्यात पूर्णा, परभणी, पाथरी, सोनपेठ, पालम आदी तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. यापूर्वी ४७० शेतकऱ्यांनी ४९४ एकरांवर तुती लागवड केलेली आहे. २०१८-१९ मध्ये ५२६ शेतकऱ्यांनी ५४१ एकरांवर नव्याने तुती लागवड केली. त्यामुळे जिल्ह्यातील तुती लागवडीचे एकूण क्षेत्र १ हजार २० एकरांपर्यंत वाढले आहे. कोष उत्पादन सुरू केलेल्या शेतकऱ्यांनी आॅक्टोबरअखेरपर्यंत १ हजार ७४० क्विंटल रेशीम कोष उत्पादन घेतले आहे. २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ८०० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात पूर्वीची २७८ शेतकऱ्यांनी २८८ एकरांवर तुती लागवड केलेली आहे. २०१८-१९ मध्ये ५३० शेतकऱ्यांनी ५४२ एकरांवर तुती लागवड केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण ८०८ शेतकऱ्यांकडे ८३० एकरांवर तुती लागवड झालेली आहे. कोष उत्पादन सुरू केलेल्या शेतकऱ्यांनी आॅक्टोबरअखेरपर्यंत १ हजार ४०२ क्विंटल कोष उत्पादन घेतले. २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ४०० एकरांवर तुती लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा रेशीम विकास कार्यालयांना देण्यात आले आहे.

रेशीम शेतीचा विस्तार नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रेशीम शेतीचा विस्तार होत आहे. २०१९-२० साठी २ हजार एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात अंडीपुजांची गरजदेखील वाढली आहे. सध्या गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथून अंडिपुंजांचा पुरवठा केला जातो; परंतु मागणी जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर अंडीपुंज उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणी येत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रेशीम संशोधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. परभणी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे अंडिपुंज निर्मिती केंद्र सुरू करण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com