नांदेड, परभणी, हिंगोलीत सप्टेंबर कोरडा

नांदेड, परभणी, हिंगोलीत सप्टेंबर कोरडा
नांदेड, परभणी, हिंगोलीत सप्टेंबर कोरडा

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाला सप्टेंबर महिन्याची सरासरी गाठता आली नाही. या तीन ही जिल्ह्यांतील १४९ मंडळांपैकी १२४ मंडळांमध्ये ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. बहुतांश भागात सप्टेंबर महिना कोरडा गेला. तीनही जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा यंदाचा नीचांक आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामावरील दुष्काळाचे सावट दिवसागणिक अधिक गडद होत चालले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी १९७.२ मिमी आहे; परंतु यंदा प्रत्यक्षात सरासरी ४२.६ मिमी (२१.६ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यातील ८० पैकी ५७ मंडळांमध्ये ५० मिमीपेक्षा कमी झाला. यापैकी ४१ मंडळांमध्ये ३० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. उर्वरित २३ मंडळांमध्ये ५१ ते ११७ मिमी पाऊस झाला आहे. खानापूर मंडळामध्ये सर्वात कमी ५ मिमी पाऊस झाला. कुरुळा मंडळात सर्वाधिक ११७ मिमी पाऊस झाला. देगलूर तालुक्यात सर्वात कमी सरासरी १६.२ मिमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्याची सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी १८०.७ मिमी आहे; परंतु यंदा प्रत्यक्षात सरासरी २१.८ मिमी (१२.१ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यातील ३९ पैकी ३६ मंडळांपैकी जिंतूर मंडळ १०७ मिमी, कात्नेश्वर ५२ मिमी, बनवस ७१ मिमी हे तीन मंडळे वगळता उर्वरित ३५ मंडळांमध्ये ० ते ३८ मिमी पाऊस झाला. १० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडळांमध्ये पेडगांव ६, दैठणा ६, बाभळगांव ५, आडगाव ८, ताडकळस ८, चाटोरी २, पालम १०, सेलू ४, कोल्हा २ या नऊ मंडळांचा समावेश आहे. देऊळगाव मंडळात पाऊस झाला नाही.

हिंगोली जिल्ह्याची सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी १६०.१ मिमी आहे; परंतु यंदा प्रत्यक्षात ११.४ मिमी (७.१ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यातील हयातगर मंडळाचा अपवाद वगळता अन्य २७ मंडळांमध्ये ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. नांदापूर आणि आजेगाव मंडळामध्ये पाऊस झाला नाही. हिंगोली ४, नरसी नामदेव १, सरमस ७, बासंबा १०, दिग्रस ३, माळहिवरा ९, खंबाळा ४, आखाडा बाळापूर ९, डोंगरकडा आणि वारंगा प्रत्येकी १, आंबा ७, गिरगाव ६, कुरुंदा ४, जवळा ३, सेनगाव २, साखरा ७, पानकनेरगाव ५ या १७ मंडळांमध्ये १० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला.

यंदाच्या पावसाळ्यात जूनपासून आजवर नांदेड जिल्ह्यात ८८४.८ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७४९.४ मिमी (८४ टक्के), परभणी जिल्ह्यात ७२३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४९४.२ मिमी (६८.३ टक्के), हिंगोली जिल्ह्यात ८४० मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७१३.१ मिमी (८४.९ टक्के) पाऊस झाला; परंतु तब्बल दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक भागातील पिके पावसाअभावी नष्ट झाली आहेत.

सततच्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा उडून गेला आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यांची समस्या जाणवत आहे. पावसाअभावी या तीन जिल्ह्यांतील दुष्काळाचे संकट दिवसागणिक अधिक गडद होत चालले आहे. पावसाच्या दीर्घ खंडाचा खरीप हंगामाला मोठा फटका बसला. रब्बी पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

सप्टेंबर महिन्यातील तुलनात्मक पाऊस (मिलिमीटरमध्ये)
जिल्हा २०१६ २०१७ २०१८
नांदेड ३०१ ६५.३१ ४२.६
परभणी ३१४.७ ८८.३ २१.८
हिंगोली २१६.७. ९७ ७.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com