नरेंद्र मोदींची १७ एप्रिलला अकलूजला सभा होणार

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ एप्रिलला अकलूज (ता. माळशिरस) येथे सकाळी नऊ वाजता सभा होणार आहे. महायुतीचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सोलापूरचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी विविध विकासकामांचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर तीनच महिन्यांत मोदी पुन्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यातच खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काॅँग्रेसपासून दूर गेल्याने आणि भाजपने त्यांचे पुत्र रणजितसिंह यांना भाजपप्रवेश देऊन पवारांवर कडी केल्याचे बोलले जात होते. पण दुसरीकडे पवार यांनीही भाजपचे सहयोगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काॅँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देत राजकीय परतफेड केल्याने या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली आहे. भाजपने मोहिते पाटलांऐवजी फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देऊन बेरजेचे राजकारण केले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानही या मतदारसंघात येणार असल्याने पवार आणि मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीविषयी मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश? राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता अकलूज येथे पंतप्रधान मोदी येणार असल्याने त्यांच्या उपस्थितीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे. रणजितसिंह भाजपमध्ये गेल्यानंतर आपण त्या पक्षात गेलो नसल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले होते. पण, आता पंतप्रधानांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com