धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे बटाटा उत्पादन वाढले: नरेंद्र मोदी

Narendra modi
Narendra modi

नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार; तसेच सिंचनाच्या अत्याधुनिक सुविधांमुळे देशातील बटाटा उत्पादनात २० टक्के वाढ झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांना आवश्‍यक सुविधा दिल्यानेच बटाटा उत्पादन वाढीला चालना मिळाली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.२८) केले. गुजरातमधील गांधीनगर येथे तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला मंगळवारी (ता.२८) प्रारंभ झाला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे परिषदेला मार्गदर्शन केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील बटाटा उत्पादन आणि सरकारी धोरणांवर प्रकाश टाकला; तसेच गुजरातमधील शेतकऱ्यांनी बटाटा उत्पादनात केलेल्या वाढीचेही त्यांनी कौतुक केले.   पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘बटाटा परिषदेला गुजरातमधील जवळपास सहा हजार शेतकरी भेट देण्याची शक्यता आहे. ही एक कौतुकास्पद बाब आहे. त्याचप्रमाणे दिल्लीच्या बाहेर गुजरातमध्ये बटाटा परिषद होते हीसुद्धा कौतुकास्पद गोष्ट आहे. बटाटा उत्पादनात गुजरातमधील शेतकऱ्यांनी गाठलेली वाढ ही आदर्श उदाहरण आहे. देशातील एकूण बटाटा उत्पादनात २० टक्के वाढ झाली आहे; तर गुजरातमधील बटाटा उत्पादनात १७० टक्के वाढ झाली आहे. धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार; तसेच सिंचनाच्या अत्याधुनिक सुविधांमुळेच बटाटा उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ करता आली. मागील दोन दशकांपासून गुजरात हे बटाटा उत्पादन आणि निर्यातीचे हब बनले आहे.’’  ‘‘गुजरातमध्ये बटाटा साठवणूक आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध आहे. राज्यात बटाटा पिकासाठी शीतगृहांचे मोठे आणि परस्पर जोडलेले जाळे आहे. त्यातील काही शीतगृहांमध्ये; तर जागतिक पातळीवरील सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील ज्या भागातील शेती आतापर्यंत कोरडवाहू होती तेथे आता सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. राज्य सरकारने सिंचनासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. ‘थेंब पाणी अधिक उत्पादन’ आणि ‘सूक्ष्म सिंचनावर भर’ हा मंत्र सिंचनासाठी वापरला आहे,’’ असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी गुजरात राज्याचे कौतुक केले.  बटाटा परिषदेविषयी... बटाटा परिषद ही दर दहा वर्षींनी आयोजित केले जाते. १९९९ आणि २००८ नंतर ही तिसरी परिषद २८ ते ३० जानेवारीदरम्यान गांधीनगर (गुजरात) येथे होत आहे. परिषदेत बटाटा क्षेत्रात झालेली प्रगती आणि पुढील दशकासाठीचा आराखडा तयार करण्यात येतो; तसेच बटाट्यावर आधारित उद्योगाची स्थिती, व्यापार, प्रक्रिया, बटाटा बियाणे उत्पादन, जैवतंत्रज्ञान, तंत्रज्ञान हस्तांतर आणि शेतकरीसंबंधित उत्पादनात सार्वजनिक-खासगी भागीदारी या विषयांवर परिषदेत ऊहापोह होणार आहे. परिषदेच्या माध्यमातून या क्षेत्रातील जगभरातील भागधारकांना एकच मंच उपलब्ध होत असतो. यंदाच्या परिषदेचे १) बटाटा परिषद २) कृषी प्रदर्शन आणि ३) बटाटा शेती दिवस, हे मुख्य तीन घटक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com