नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी शेतीशिवार गजबजले

गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग, उडीद सोंगणीनंतर आता रब्बीच्या गहू, हरभरा पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे.
In Nashik district, farms are busy for rabi sowing
In Nashik district, farms are busy for rabi sowing

गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग, उडीद सोंगणीनंतर आता रब्बीच्या गहू, हरभरा पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. शेतातील काडी कचरा, तण काढून शेतकरी पूर्वमशागत कामात व्यस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. बैल व रेड्यांच्या जोड्या नांगरास जोडून नांगरणी जोरात सुरू आहे. 

काही जण ट्रॅक्टरने, तर बहुतांशी आदिवासी शेतकरी घरच्या लाकडी नांगराने रब्बीसाठी शेते तयार करत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील त्रंबकेश्वर, नाशिक, पेठ तालुक्यातील कामे जोरात सुरू आहेत.

यंदाच्या कोरोना संकटातून सावरून मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतीमाल यंदा परतीच्या प्रवासात पाण्यात गेला. ऐन निसवणीत, काढणीस आलेले उभे भाताचे पीक पाण्यात गेले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. टोमॅटो कीड रोगांचा प्रादुर्भाव अशा संकटात खरीप हातातून गेला. आता त्यातून सावरत शेतकरी रब्बीच्या गहू, हरभरा पेरणीसाठी शेत वावरे तयार करण्यात व्यस्त आहेत.

यंदा थंडी अधिक असल्याच्या संकेतांमूळे हरभरा व गव्हाचे बियाणे बाजारातून विकत घेतल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. पारंपरिक बियाणे बऱ्याच प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे आता बियाणे उत्पादक कंपन्यांच्या गहू, हरभरा बियाण्यांना चांगला उठाव आहे. तत्पूर्वी, नांगरणी, शेणखत, कंपोस्ट खत टाकून तापलेल्या वावरात गहू, हरभऱ्याची पेरणी नांगरामागे केली जाते.

यंदा मात्र पेरणीही उशिरा होण्याची स्थिती आहे, असे गहू उत्पादक शेतकरी लक्ष्मण बेंडकोळी (गालोशी), गोविंदराव बेंडकोळी यांनी सांगितले. येत्या महिनाभरात गहू, हरभऱ्याचा पेरा पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. 

विहिरींचे व कश्यपी धरणाच्या पाइपलाइनचे पाणी शेतीला मिळते. मात्र, उन्हाळ्यात विहिरी आटतात. मग, धरणाचे पाणी ३० टक्के राखीव असताना सोडून दिले जाते. परिणामी, रब्बीची पिके अडचणीत येतात. तरी निसर्गाच्या भरवशावर उपलब्ध पाण्यावर पिके घेतो. असे शेतकरी गोविंदराव बोंडकोळी म्हणाले.

कृषी विभागाच्या अधिक योजना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाने गाव बांधपर्यंत आले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान कळेल, योजना कळतील. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या गटशेती प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शेतीत विविध प्रयोग करत आहोत.  - गोविंदराव बेंडकोळी, शेतकरी, गालोशी, जि. नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com