नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले

नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले
नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले

नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी संततधार कायम असून, रविवारी (ता. ७) दिवसभर पाऊस शहर व परिसरात ठाण मांडून होता. जिल्ह्यात सोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत ७२६ मिमी पावसाची नोंद झाली. या झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन गोदावरीला पहिला पूर आला. सलग तीन दिवस पावसाने जोर धरल्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. त्र्यंबकेश्‍वरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस झाल्याने धरणसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

जूनमध्ये महिनाभर पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली असून, तीन दिवसांपासून नाशिक शहर परिसरासह विविध तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरात शनिवार (ता. ६) रात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात होऊन रविवारी दिवसभर तो सुरूच असल्याने ठिकठिकाणच्या सखल भागांत पाणी साचले होते. 

गोदावरी नदीला पावसाळ्यात पहिला पूर आला. सायंकाळी ७ वाजता अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ पाण्याचा वेग ६२८७ क्यूसेक इतका विसर्ग होता. नासर्डी व वालदेवी नदीच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. पुराच्या पाण्यात अनेक वाहने अडकून पडली. शहरात नाशिकरोड, सिडको, सातपूरसह अन्य उपनगरांतही पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. सिडकोत अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. 

त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्यातही संततधार कायम राहिल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. या पावसामुळे त्र्यंबकेश्‍वर शहरातील रस्त्यांवर पाणी खळाळून वाहत होते. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले. नाशिक - त्र्यंबक रस्त्यावर पिंपळगाव बहुला येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने नाशिक व त्र्यंबकेश्‍वर यांच्यातील वाहतुकीचा संपर्क तुटला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली. इगतपुरी तालुक्यात अस्वली स्टेशन ते मुंढेगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. 

जिल्ह्यातील पेठ, सिन्नर, दिंडोरी व सुरगाण्यातही चांगल्या पावसाचे आगमन झाले. तर देवळा, कळवण, येवला, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. या पावसामुळे बळिराजा सुखावला असून, ग्रामीण भागांत भात, मका, बाजरी, सोयाबीन, नागलीसह खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.

धरणसाठ्यात लक्षणीय वाढ नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्यांत सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर व दारणा धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. गंगापूर धरणातील साठा १९०६ दलघफूवर पोचला असून, त्याची टक्केवारी ३४ इतकी झाली आहे. तर समूहातील अन्य धरणांपैकी गौतमी-गोदावरी धरणातील पाणीसाठा ३९८ दलघफू ( २१%) आणि कश्यपीत पाणीसाठा ४५३ दलघफू( २४%) झाली आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे दारणा धरणात पाणीसाठा २७४६ दलघफू( ३८ %) झाली आहे तर भावली धरणात  सध्या ५६१ दलघफू (३९%), मुकणेत ८६८ दलघफू (१२%) पाणी जमा झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com