नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात धुव्वाधार पाऊस

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात धुव्वाधार
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात धुव्वाधार

नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक शहर व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे धारणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर त्र्यंबकेश्वर शहरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हा दमदार पाऊस शेतकरी वर्गाला सुखावणारा आहे. 

जिल्ह्यात रविवार (ता. २८) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये इगतपुरी तालुक्यात १२६ मिमी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ मिमी पावसाची नोंद झाली. भावली धरण शंभर टक्के भरले असून, दारणा धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून शनिवार (ता. २७) १२ हजार ९९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. अस्वलीच्या लष्करी हद्दीतही संततधार पावसाने मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंडओहोळ नदीलाही पूर आला असल्याने त्यातच दारणाचा विसर्ग सोडल्यामुळे दारणापात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे.

दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने या धरणातील पाणीसाठा दिवसभरात रात्रीतून ८२ वरून ८८ टक्क्यांवर पोचला. पाऊस सुरूच असल्याने या धरणातूनही दिवसभर मोठ्या प्रमाणावर पाणी नांदूर मध्यमेश्वरकडे सोडण्यात आले. प्रशासन सतर्क असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये शनिवारी (ता. २७) इगतपुरी तालुक्यातील निरपन येथील रहिवासी राजू वारे तसेच भाम धरणक्षेत्रात एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे समजते. 

त्र्यंबकेश्वर परिसरात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला. ६६ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांवर पोचला आहे. दारणासह भावली धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आल्याने पाणी मराठवाड्याकडे जाण्यास सुरू झाले आहे. 

अर्धा जिल्हा कोरडाच... जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिक यांसारख्या काही तालुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस आहे. अन्य तालुक्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. सिन्नर, चांदवड, कळवण, बागलाण, येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांमध्ये १.७ ते ११ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. पश्चिम पट्ट्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस दमदार पाऊस होत असला तरी गिरणा व पालखेड धरणसमूहातील अनेक धरणे कोरडी आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com