नाशिक जिल्ह्यात १८१ कोटींच्या निधीचे तालुकानिहाय होणार वाटप

Nashik district will be allocated Rs 181crores as taluka leval
Nashik district will be allocated Rs 181crores as taluka leval

नाशिक : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप पिकांसह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे सात लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या ६ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेने पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडे मदत म्हणून ६३६ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ वितरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी (ता. २०) कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार हा निधी तालुकानिहाय वितरित करण्यात येत आहे. 

प्राप्त झालेले अनुदान तहसील कार्यालयांना बीडीएस स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले असून, तहसील कार्यालयांकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती, त्यांचे बँक तपशील उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या निकषानुसार या मदतीचे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे. मालेगाव, बागलाण, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान असून, त्यामुळे या तालुक्यांना त्या प्रमाणात अनुदान वितरित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, डाळिंब, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे साडे सहा लाख हेक्टरवरील पिके या पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीद्वारे दिलासा देता यावा, याकरिता जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता. मात्र, पहिल्या टप्प्यात १८१ कोटी ५० लाख ८४ हजारांची मदत प्राप्त झाली असून, एकूण मागणीच्या २८.५२ टक्के मदत प्राप्त झाली आहे.

शेतकऱ्यांना किमान दिलासा देण्यासाठी मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यासाठी सर्वाधिक २९ कोटी ४५ लाख ९१ हजार रुपयांची मदत तहसीलदार स्तरावर वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात नुकसान कमी असल्याने त्यांच्याकडे तुलनेने सर्वांत कमी १ कोटी ६६ लाख ९७ हजार रुपयांची मदत सुपूर्त करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com