नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा तडाखा

Nashik in eastern region rainfall with storm
Nashik in eastern region rainfall with storm

नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी (ता. २९) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडविली. पावसाचे रूपांतर वादळवाऱ्यात व नंतर गारा पडण्यात झाली. त्यामुळे या भागात काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उन्हाचा चटका होता. मात्र, सायंकाळी अचानक हवामानात बदल दिसून आला. नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील डॉक्टरवाडी, बाभूळवाडी, जळगाव खुर्द, जळगाव बुद्रुक, पिंपरखेड, परधाडी, चांदोरे, कासारी, नस्तनपूर आसपासच्या गावांमध्ये शिवारात वादळी वाऱ्यासह गारांसह पावसाने हजेरी लावली. एक तासभर पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतात पाणी साचले. तर काही ठिकाणी नाल्यांना पाणी आले, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली. 

तालुक्याच्या पूर्व भागात काढणीस आलेल्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पिंपरखेड परिसरात गारांच्या तडाख्यात काढणीस आलेली मोसंबी व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच कांदा, गहू, हरभरा या पिकांना ही फटका बसला. काढणीस आलेला गहू वादळ वाऱ्यामुळे शेतातच आडवा झाला, तर मोठ्या प्रमाणावर शेतातच भिजला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, महसूल यंत्रणेने नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

वादळी पावसाने ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जळगाव खुर्द येथेही गारपिटीने शेतातील काढणीला आलेली गहू, हरभरा आदी पिके आडवी झाल्याचे दिसून आले. मन्याड नदीपासून जळगाव खुर्दपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गारांचा खच पडलेला होता. सायंकाळी घरी परतलेल्या जनावरांनाही गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. हा कांदा साठवणी योग्य राहणार नसल्याचे संकट कांदा उत्पादकांसमोर आहे.

तालुक्यात पूर्व भागात एक तास पाऊस पडला. त्यामुळे रब्बी काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावांमध्ये कृषी विभागातर्फे पाहणी करण्यात आली असून नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आले आहे. मात्र, नुकसान मोठे आहे. - जगदीश पाटील,  तालुका कृषी अधिकारी, नांदगाव 

सायंकाळी सुरुवातीला थोड्या आलेल्या पावसाचे रूपांतर मुसळधार पाऊस नंतर वादळ वाऱ्यात झाले. तसेच नंतर गारा पडल्या. यात काढणीला आलेला ३ एकर द्राक्षबाग तसेच काढणीस आलेले कांदे, उभे गहू व मका पीक खराब झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.  - आबासाहेब सोमवंशी, शेतकरी, पिंपरखेड, ता. नांदगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com