National Award to ‘Kalsubai’ Seed Society
National Award to ‘Kalsubai’ Seed Society

‘कळसूबाई’ बियाणे संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

पिकांचे स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्‍वत वापरासाठी दिला जाणारा ‘राष्ट्रीय जिनोम सेव्हियर कम्युनिटी पुरस्कार’ यंदा अकोले (जि. नगर) तालुक्यातील कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेला मिळाला आहे.

पुणे ः भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटीज अँड फार्मर्स राइट्स ॲथॉरिटी मार्फत पिकांचे स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्‍वत वापरासाठी दिला जाणारा ‘राष्ट्रीय जिनोम सेव्हियर कम्युनिटी पुरस्कार’ यंदा अकोले (जि. नगर) तालुक्यातील कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेला मिळाला आहे.  नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुख्यालयात गुरुवारी (ता.११) रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, सदस्या पद्मश्री राहीबाई पोपेरे तसेच ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉ. विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपये आहे.  या कार्यक्रमामध्ये ममताबाई भांगरे (देवगाव, ता. अकोले, जि. नगर) यांना जंगली अन्न वनस्पती, सेंद्रिय शेती आणि विविध पिकांच्या ६८  स्थानिक वाणांच्या संवर्धनातील योगदानाबद्दल ‘प्लान्ट जिनोम सेव्हियर शेतकरी सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. हा पुरस्कार दीड लाखांचा आहे. गेली आठ वर्षे अकोले तालुक्यात स्थानिक वाण संवर्धनासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून बियाणे संवर्धनाचा कार्यक्रम सुरू आहे. शबरी आदिवासी महामंडळ, नाशिक यांच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबवला जातो. अकोले तालुक्यात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे.  संस्थेने वातावरण बदल आणि पोषण सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ११४ पीक वाणांचे संवर्धन केले आहे. या भागातील खास वैशिष्ट्य असलेला काळ भात, रायभोग, कोळपी भात, कडू व गोड वाल, हिरवा घेवडा, लाल घेवडा, वाटाणा, हुलगा, हरभरा, घेवडा तसेच वरई पिकाच्या स्थानिक वाणांचे संवर्धन केले आहे. गेल्या हंगामात संस्थेने भात, वाल, हरभरा, वाटाणा या पिकांच्या नऊ स्थानिक वाणांचे २५ टन बियाणे तयार करून वितरण केले. गेल्या हंगामात सुमारे दहा टन तांदूळ विक्री झाली आहे. गेल्या हंगामात सुमारे १८,८०० परसबाग बियाणे संचाची विक्री केली. संस्थेच्या माध्यमातून कोंभाळणे, एकदरे, देवगाव मध्ये गावरान बियाणे बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com