पुरंदर विमानतळालगत उभारणार राष्ट्रीय बाजार

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) पर्यायी जागेची मागणी केली आहे. पुरंदर तालुका हा पुणे शहराला जवळ आहे, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील होत आहे. यामुळे शेतीमालाची निर्यात आणि देशांतर्गत व्यापार करण्यास मदत होईल. - विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गुलटेकडी येथील बाजार समितीचे आवार पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळालगत उभारण्यासाठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बाजार समिती प्रशासनाने यापूर्वीच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) रिंगरोडलगत सलग ४०० एकर जागेची मागणी केली होती. यानंतर आता जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी प्रशासनाला जागेची पाहणी आणि मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पणन सुधारणांमुळे निर्माण होणारा राष्ट्रीय बाजार विमानतळालगत उभारला जाणार आहे.

पणन सुधारणांमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याचे आवार हे शेतीमाल खरेदी विक्रीसाठी कमी पडत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर दिवे येथे राष्ट्रीय बाजार संकुल उभारावे, अशी मागणी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संकुलाबाबत सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच गायरानाची जागा उपलब्ध असल्याने मोबदला देण्याचा प्रश्‍न येत नाही. या जागेची पाहणी, मोजणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. या संकुलाबाबत शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते, दौंड-पुरंदर उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे आदी उपस्थित होते.

...तर गुलटेकडीला विशेष वस्तू बाजार दरम्यान पुणे बाजार समितीच्या पुनर्विकासाठीदेखील प्रयत्न झाले होते. मात्र आता पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळालगत बाजार झाल्यास, गुलटेकडी येथील बाजार समितीच्या आवाराला विशेष वस्तूंचा बाजार घोषित करण्याची शक्यता आहे. विशेष वस्तूंचा बाजार उभारण्यासाठीचीदेखील तरतूद पणन सुधारणांमध्ये करण्यात आली आहे. यामुळे आताच्या आवारात शीतगृहे आणि विशेष वस्तूंचा बाजार उभारला जाऊ शकतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com