दणक्यानंतर बॅंका आल्या ताळ्यावर; ४५१ कोटींचे पीककर्ज वाटप

दणक्यानंतर बॅंका आल्या ताळ्यावर; ४५१ कोटींचे पीककर्ज वाटप
दणक्यानंतर बॅंका आल्या ताळ्यावर; ४५१ कोटींचे पीककर्ज वाटप

यवतमाळ : मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तब्बल ४५१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या धडक कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंका ताळ्यावर आल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची गती वाढली आहे. पेरणी सुरू झाल्यानंतरही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वाटपात आखडता हात घेतला होता. सूचना देऊनही कर्जवाटपाची टक्केवारी वाढली नाही. परिणामी, शेतकऱ्यांची अडवणूक सुरू होती. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांना जाग आली. मागील आठ दिवसांत बॅंकांनी तब्बल ४५१ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. यापूर्वी कर्ज वाटपाचा आकडा ३७७ कोटी रुपयांवर स्थिरावला होता. त्यानंतर कारवाईमुळे सोमवारी (ता.१८) बॅंकेव्दारा २१ कोटी तर मंगळवारी (ता.१९) बॅंकांनी २२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. विशेष म्हणजे भारतीय स्टेट बॅंकेचे (एसबीआय) शासकीय खाते बंद केले असले तरी इतर बॅंकांनी धडा घेत कर्जवाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन हाती घेतले. शेतकरीहित लक्षात घेता जिल्हाधिकारी देशमुख यांनी एसबीआयवर केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना कर्जवाटपात गती आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते नीमिष मानकर, पालिकेतील गटनेते पंकज मुंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, चिकणीचे सरपंच नीलेश राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले.  तत्पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, प्रगतिशील शेतकरी अमृत देशमुख, बाबासाहेब पाटे यांच्यासह महागाव व उमरखेड येथील शेतकऱ्यांनीही जिल्हाधिकारी देशमुख यांचे स्वागत केले. विखे पाटील यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक यवतमाळ आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. जिल्ह्यात एसबीआयला ५७१ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी दहा टक्केही कर्जवाटप झाले नव्हते. एसबीआयने अशी कर्जवाटपाबाबत केलेली हलगर्जी अक्षम्य आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासारखा आहे. त्यामुळे दोषी असलेल्या एसबीआयच्या अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी करून विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करीत त्यांचे कौतुकही केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com