पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीवर

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीवर
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीवर

पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच विधानसभा मतदारसंघांत अटीतटीची लढत झाली. जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघांत राष्ट्रवादीने, तर ९ मतदारसंघांत भाजपचे आणि २ मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे.  

पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे स्वप्न भंगले आहे. काँग्रेसचे संजय जगताप यांनी ३१ हजार ३१ हजार मतांनी शिवतारे यांचा पराभव करीत आपला ऐतिहासिक विजय मिळविला. 

भोर मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे हे सुरवातीपासून आघाडीवर होते. त्यांना एक लाख ८ हजार ९२५ मते मिळाली होती. तर शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना ९९ हजार ७१९ मते मिळाली होती. थोपटे हे तिसऱ्यांदा निवडून आले.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार शरद सोनवणे हे पराभूत झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांना मोठे मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी पहिल्या फेरीपासून वर्चस्व मिळवत विजयाकडे वाटचाल केली होती. अखेर त्यांनी ९ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

इंदापूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय भरणे आणि भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात मोठी चुरस झाल्याचे पाहायला मिळाले. भरणे यांनी मोठे तीन हजारांहून अधिक मताधिक्य घेत दुसऱ्यांदा विजयी झाले असून, त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. 

दौंडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश थोरात आणि भाजपकडून ॲड. राहुल कुल यांच्यात चांगलीच लढत झाली. शेवटच्या फेरीत राहुल कुल यांनी अवघे ७७३ मताधिक्य घेत विजय मिळवला. 

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अशोक पवार आणि भाजपकडून बाबूराव पाचर्णे यांच्यात लढत झाली. सुरवातीला बाबूराव पाचर्णे हे आघाडीवर असले तरी फेऱ्यामध्ये बदलत गेल्यानंतर अशोक पवार विजयी झाले आहेत.

खेडमध्ये राष्ट्रवादीकडून दिलीप मोहिते, भाजपचे सुरेश गोरे आणि अतुल देशमुख यांच्यात जोरदार लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते अखेर चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. 

आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी सुरवातीपासून वर्चस्व मिळवत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.  

भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी तब्बल ९३ हजारांहून अधिक मतांनी भेगडेंचा पराभव केला आहे. बाळा भेगडे सलग तीन वेळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 

पुणे, पिंपरीत भाजपचे वर्चस्व

पुणे शहरातील हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे सुमारे २७०० मतांनी विजयी झाले आहेत. तुपे हे सुरवातीला इच्छुक नसताना अचानक उमेदवारी दिल्यानंतर मतदारांमध्ये उत्साह निर्माण करून त्यांनी जवळपास साडे सात हजार मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी योगेश टिळेकर आणि वसंत मोरे यांच्यात राजकीय वैर असल्याने त्याचा फायदा चेतन तुपे यांना झाल्याचे दिसते. कोथरूडमधून मनसेकडून किशोर शिंदे व चंद्रकांत पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. सुरवातीपासून चंद्रकांत पाटील  हे आघाडीवर असले तरी शेवटच्या फेरीअखेर कमी होऊन ते तीन हजार मतांनी विजयी झाले.  

खडकवासला मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन दोडके तर भाजपकडून भिमराव तापकीर यांच्यात चांगलीच लढत होती. २३ व्या फेरीपर्यंत आकडेवारी पुढे आल्यानंतर अत्यंत चुरशीची लढत झाली. त्यानंतर फरक दीड ते दोन हजारांपर्यंत आला होता. त्यामुळे आमदार म्हणून कार्यरत असलेले भिमराव तापकीर यांना झुंजावे लागत होते. २३ व्या फेरीअखेर श्री. तापकीर यांना एक लाख १८ हजार ६२७ मते पडून विजयाकडे वाटचाल सुरू होती. 

पुणे कॅन्टोमेंन्टमध्ये कॉंग्रेसचे रमेश बागवे व भाजपचे सुनील कांबळे यांच्यात चुरशीची लढत सुरू होती. वंचितच्या उमेदवारालाही चांगली मते मिळाली आहेत. 

शिवाजीनगर मतदार संघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात मुख्य चुरस होती. तर सिद्धार्थ शिरोळे यांनी पाच हजार मतांनी विजयी झाले आहेत.

कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक या सुरवातीपासून आघाडीवर होत्या. या मतदार संघात चौरंघी लढत होती. परंतु ही एकतर्फी लढत झाल्याचे दिसून येते. या मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी झाल्या.

वडगाव शेरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकचे सुनील टिंगरे यांना सुरवातीला कमी मताधिक्य होते. मात्र, ९ व्या फेरीअखेर मताधिक्य घटले होते. त्यानंतर जगदीश मुळीक हे आघाडीवर आले असले तरी अंतिम फेरीअखेर सुनील टिंगरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. 

पर्वती विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ या विजयी झाल्या. 

पिंपरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आण्णा बनसोडे यांना सहा हजार मतांनी आघाडी मिळाली आहे. गौतम चाबुकस्वार हे पिछाडीवर पडले. बनसोडे यांनी पाच हजार मतांची आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय झाला आहे. पिपरी मतदार संघातील संत तुकारामनगरमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. 

भोसरी मतदार संघात महेश लांडगे आणि राष्ट्रवादी पुरस्कृत विलास लांडे यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये जवळपास ८० हजार मतांच्या फरकाने महेश लांडगे हे विजयी झाले आहेत. 

चिंचवड मतदार संघात भाजपकडून लक्ष्मण जगताप तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत झाली. त्यामध्ये लक्ष्मण जगताप हे १७ व्या फेरीअखेर ३८ हजार मतांनी आघाडीवर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com