राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष नेमणुकीचा निर्णय अद्याप नाही

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष नेमणुकीचा निर्णय अद्याप नाही
राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष नेमणुकीचा निर्णय अद्याप नाही

मुंबई ः सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून पाच दिवस उलटले, तरी राष्ट्रवादीला मुंबईच्या नव्या अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत अद्याप निर्णय घेता आलेला नाही. राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह आमदार किरण पावसकर, विद्या चव्हाण, माजीद मेमन यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करायचे, यावर राष्ट्रवादीत घोळ असल्याचे कळते.

राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णत: अंधारात ठेवून सचिन अहिर यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतेवेळी अहिर हे मुंबईचे अध्यक्ष होते. आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे सौजन्य न दाखविता अहिर यांनी थेट शिवसेनेचा भगवा हातात घेतला. अहिर यांच्या पक्षत्यागाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाने मुंबईच्या अध्यक्षपदाबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मुंबईच्या नेतृत्वाबाबत पक्षात एकमत होताना दिसत नाही. 

मुंबईच्या अध्यक्षपदासाठी नवाब मलिक यांचे नाव आघाडीवर आहे. मलिक हे मुंबईतील कुर्ला, अणुशक्तीनगर परिसरात मासबेस असलेले नेते आहेत. मलिक यांच्याशिवाय कामगार संघटनेत कार्यरत असलेले किरण पावसकर, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या विद्या चव्हाण तसेच राज्यसभा सदस्य माजीद मेमन यांची नावे संभाव्य अध्यक्ष म्हणून घेतली जात आहेत. 

दरम्यान, महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा निर्णय एका दिवसात होतो. मग मुंबईच्या अध्यक्षपदाबाबत विलंब का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यासंदर्भात नवाब मलिक यांच्याशी संपर्क साधला असता मुंबईच्या नव्या अध्यक्षपदाबाबत अजून निर्णय झालेला नाही. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com