बिहारमध्ये ‘एनडीए’च ! तेजस्वीकडून 'काटेकी टक्कर'

पाटणा : कोरोना संसर्गाच्या अभूतपूर्व वातावरणात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अखेरचा टप्पाही अभूतपूर्वच ठरला. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने जवळपास हिसकावून घेतलेली सत्ता राखण्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कसेबसे यश मिळविले.
बिहारमध्ये ‘एनडीए’च ! तेजस्वीकडून 'काटेकी टक्कर'
बिहारमध्ये ‘एनडीए’च ! तेजस्वीकडून 'काटेकी टक्कर'

पाटणा : कोरोना संसर्गाच्या अभूतपूर्व वातावरणात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अखेरचा टप्पाही अभूतपूर्वच ठरला. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने जवळपास हिसकावून घेतलेली सत्ता राखण्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कसेबसे यश मिळविले. भाजपची वाढलेली ताकद, नितीश यांचा घटलेला करिष्मा, तेजस्वी यांचे उदयास आलेले नेतृत्व, काँग्रेसचे तेच ते फिकेपण आणि चिराग पासवान यांना वास्तवाचे आलेले भान, ही या निवडणुकीची गोळाबेरीज म्हणता येईल. या निवडणुकीतील डाव्यांचे यशही डोळ्यांत भरण्यासारखे आहे.   कोरोनाकाळात झालेली देशातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. कोरोना नियमांचे पूर्ण पालन करून झालेल्या या निवडणुकीत मतदान यंत्रांचा अधिक वापर झाल्याने अंतिम निकालही रात्री उशिरा जाहीर झाले. बिहारच्या २४३ विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२४ जागा मिळाल्या, तर महाआघाडीला १११ जागा मिळाल्या. भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक जागा मिळवत आपापल्या मित्रपक्षांवर दबाव निर्माण केला आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जागांमध्ये मोठी घट असली तरी तेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याने आणि आगामी राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून भाजपने नितीश हेच मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा जागा जवळपास दुप्पट असल्याने सत्तेची सूत्रे भाजप आपल्या हातात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार हे उघड आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या तब्बल २० जागा वाढल्या आहेत, तर जेडीयूच्या २८ जागा घटल्या आहेत. आघाडी म्हणून ‘एनडीए’ची गेल्या वेळच्या तुलनेत एक जागा कमी झाली आहे, तर महाआघाडीची एक जागा वाढली आहे. रात्री उशीरापर्यंत काही जागांवर मतमोजणी सुरु होती.  ‘रालोआ’ला काठावरचे बहुमत मिळाले आहे. या बहुमतात भाजपचा वाटा मोठा आहे. नितीश यांच्याशी भांडण न करता त्यांनी आपल्या जागा वाढविल्या आहेत. मात्र, त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. याउलट लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यावर ‘राजद’ची धुरा हाती घेतलेल्या तेजस्वी यादव यांनी पक्षाचे महत्त्व कायम ठेवले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना काही जागा कमी मिळाल्या असल्या तरी तेजस्वी यांचा प्रचारातील झंझावात त्यांना राज्यातील प्रमुख नेता म्हणून प्रस्थापित करण्यास पुरेसा ठरणार आहे. याउलट, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या जागा तर घटल्याच, शिवाय पक्षनेते म्हणून राहुल गांधी पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोणत्याही आघाडीत सामील न झालेल्या आणि धडाकेबाज प्रचार करत अपेक्षा निर्माण केलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत त्यांना दोन जागा मिळाल्या होत्या.  इतर पक्षांमध्ये सर्वांत उल्लेखनीय यश डाव्या पक्षांनी मिळविले. गेल्या निवडणुकीत भाकप, माकप आणि भाकप (मार्क्सवादी-लेनिनवादी) या तीन पक्षांना मिळून केवळ तीन जागा मिळाल्या होत्या, यंदा त्यांनी १८ जागांपर्यंत धडक मारली. ‘एमआयएम’ या पक्षालाही पाच जागांवर यश मिळाले. 

विजयाचा दावा रात्री साडे अकरा वाजता भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विजयाचा दावा केला. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी ‘एनडीए’चा विजय झाल्याचे सांगतानाच ‘राजद’ला पराभव पचवता येत नसल्याचा टोला मारला आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीही यावेळी उपस्थित होते. राजदने मात्र सरकारकडून मतमोजणीत हेराफेरीचा दावा करत निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे.

अमित शहा -नितीशकुमार बोलणी  निकालाची अनिश्‍चितता संध्याकाळी वाढल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नितीश यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि इतर भाजप नेतेही गेले होते. भाजपच्या वाढलेल्या आणि जेडीयूच्या घटलेल्या जागांबाबत आणि आगामी रणनितीबद्दल या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते, मात्र त्याचा तपशील अधिकृतपणे समजला नाही. बिहारमधील बहिणी-मुलींनी यंदा विक्रमी संख्येने मतदान करत आत्मनिर्भर बिहारमधील त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले आहे. आगामी दशक युवाशक्तीचे असेल. त्यांनी स्वत:च्या सामर्थ्यावर आणि एनडीएवर विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या ऊर्जेमुळे पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम करण्याचा उत्साह ‘एनडीए’मध्ये निर्माण झाला आहे.  - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com