राज्यात महायुतीची त्सुनामी...

लोकसभा निवडणुक
लोकसभा निवडणुक

मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचाच करिश्मा चालल्याचे दिसून येते. ‘‘मोदी है तो मुमकीन है’’ म्हणत भाजपने सुरू केलेल्या आक्रमक प्रचार मोहिमेला महाराष्ट्रातही घवघवीत यश मिळाले आणि विरोधकांचा सुफडासाफ झाला. मोदींचे नेतृत्व, भाजपचे प्रचार तंत्र कौशल्य, संघटनेचे बळ, मुख्यमंत्र्यांचे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे धोरण आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे राज्यातील भाजप-सेनाविरोधी मतांमध्ये पडलेली फूट यामुळे महायुतीला अनपेक्षित मोठे यश मिळाल्याचे दिसते.   २०१९ च्या या मोदी त्सुनामीत विरोधीपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या दिग्गज उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. नांदेड, मावळ, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर या बालेकिल्ल्यातील पराभव विरोधकांच्या जिव्हारी लागला आहे. तर निवडणुकीतील या दणदणीत यशामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना युतीचा आत्मविश्वास वाढणार आहे.  दरम्यान, मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयासह राज्यभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयात दोनशे किलोंचा लाडू आणला होता. विजयाचा हा लाडू कार्यकर्ते एकमेकांना भरवत होते. ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरत कार्यकर्ते नाचत, फुगडी घालत होते. तर तिकडे विरोधकांच्या गोटात शांततेचे वातावरण होते.  २०१८ वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या पारड्यात यशाचे माप टाकले होते. या निवडणुकीत ज्या राजकीय पक्षांना यश मिळते तो पक्ष पुढे जाऊन देशाच्या सत्तेत जातो. या निवडणूक निकालांमधून देशाच्या बदलत्या मूडची झलक दिसून येते, असे समजले जाते. तसेच मोदी सरकारच्या कार्यकाळात नोटबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, धोरणातील अभावामुळे कृषी क्षेत्रात झालेली ऐतिहासिक पीछेहाट, शेतीमालाच्या दरातील अभाव, राज्यातील दुष्काळी स्थिती, वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकरी कर्जमाफीचे अपयश आदी विविध मुद्यांवर ग्रामीण जनतेत मोठा आक्रोश होता त्याचे प्रतिबिंब निवडणूक निकालात उमटेल अशी चिन्हे होती. लोकांच्या नाराजीची मोठी किंमत राज्यात भाजप-शिवसेनेला चुकवावी लागेल असे चित्र होते. मात्र, मतमोजणीत हे सगळे अंदाज फोल ठरले. जनता भाजपविरोधात तक्रार करीत होती, पण विरोधात नव्हती असाच निकाल आला आहे.  राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरवात झाली. सुरवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरू झाली. मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच भाजप-सेना युतीचे उमेदवार हळूहळू आघाडी घेताना दिसत होते. सकाळी दहा वाजताच युतीचे सुमारे ४० उमेदवार आघाडीवर होते. पुढे पुढे युतीच्या उमेदवारांचा आकडा आणि मतांची आघाडीही वाढत गेली. दुपारपर्यंत युतीच्या अनेक उमेदवारांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर सुमारे ५० हजारांपासून ते लाखभरापर्यंतचे मताधिक्य घेतले होते.  प्रतिष्ठीत आणि लक्षवेधी लढती अख्ख्या देशाचे लक्ष लागलेल्या आणि दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतदारसंघात सुरवातीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या उमेदवार कांचन कूल यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. काही फेऱ्यांमध्ये कांचन कूल यांनी मताधिक्य घेतल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळेंनी मोठे मताधिक्य घेतले. बारामतीसोबत शिरूर, सातारा, रायगडची जागा राष्ट्रवादीने जिंकली आहे. मात्र, राष्ट्रवादीला माढा, कोल्हापूरची हक्काची जागा या वेळी राखता आलेली नाही. शरद पवारांचे नातू पार्थ पवार लढत असलेल्या मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी मोठा विजय संपादन केला आहे. ही जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. अमरावतीची जागा राष्ट्रवादीच्या खात्यात जमा होईल अशी चिन्हे आहेत. याठिकाणी नवनीत कौर यांच्याकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांना पराभवाच्या छायेत आहेत. रायगडमध्ये २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. या वेळी तटकरे यांनी शिवसेना नेते केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा पराभव करीत वचपा काढला आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी खुद्द शरद पवार नगरमध्ये तळ ठोकून होते. मात्र, याठिकाणी सुजय विखे यांनी लाखभराहून अधिकचे मताधिक्य घेत ही जागा जिंकली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. या वेळी मात्र ही जागा भाजपने पुन्हा खेचून घेतली आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीकडे पाच जागा होत्या, तेवढ्या जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश येईल असे दिसते. जागांची अदलाबदल झाली असली तरी राष्ट्रवादीचे संख्याबळ कायम राहील.  २०१४ ला काँग्रेसने राज्यात दोन जागा जिंकल्या होत्या. नांदेड आणि हिंगोलीच्या दोन्ही जागा यंदा काँग्रेसला गमवाव्या लागल्या आहेत. या वेळी काँग्रेसला चंद्रपूर हात देईल अशी चिन्हे आहेत, काँग्रेसचे एकमेव उमेदवार बाळू धानोरकर याठिकाणाहून आघाडीवर आहेत. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर चंद्रपूरमध्ये पराभवाच्या छायेत आहेत.  अकोला आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला आहे. औरंगाबादमध्ये मात्र त्यांच्या आघाडीचे इम्तियाज जलील यांनी चारवेळचे खासदार शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत विजयाचा झेंडा फडकावण्याच्या तयारीत आहेत. याठिकाणी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या ट्रॅक्टरचा फॅक्टर खैरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. दोनदा खासदार झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना तिसऱ्यांदा मात्र पराभव पत्करावा लागला आहे. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या नवख्या धैर्यशील माने यांनी विजय संपादन केला आहे. कोकणपट्ट्यातील मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दहाही जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी झाले आहेत. याठिकाणी युतीला रोखण्यात आघाडीला पुन्हा एकदा अपयश आले आहे.  वंचित फॅक्टरचा परिणाम राज्यात अनेक मतदारसंघात अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी भाजप-सेनेच्या मदतीला धावून आली. वंचितच्या उमेदवारांमुळे मतविभाजनाचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सोसावा लागल्याचे आकडेवारीतून दिसते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठी मते घेतल्याने भाजप-सेनेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. वंचित आघाडीमुळे विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकाराला लागला. हा पराभव विरोधकांच्या जिव्हारी लागण्यासारखा आहे. या दोन्ही बाबी भाजप-सेना युतीच्या पथ्यावर पडल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना, सोलापुरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. अशोक चव्हाण यांचा ५० हजार मतांनी पराभव झाला आहे. याठिकाणी वंचित बहुजनच्या उमेदवाराने सव्वालाखाहून अधिकची मते घेतली आहेत. प्रचारात वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत होता. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींविरोधात राज्यभर झंझावात तयार केला होता. त्याचा लाभ महाआघाडीच्या उमेदवारांना होईल असे अंदाज होते. विशेषतः कोकणपट्ट्यात मुंबई, ठाणे भागात युतीच्या उमेदवारांना राज यांच्या सभांचा फटका बसेल अशी चिन्हे होती. मात्र, मतमोजणीत हे सगळे अंदाज खोटे ठरले. यंदाच्याही लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे फॅक्टर चालला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात शिवसेना नेतृत्वाने भाजप नेतृत्वावर वारंवार तोंडसुख घेतले. लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाही सेनेने केली होती. प्रत्यक्षात, निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपसोबत युती करून सेनेने ऐतिहासिक यूटर्न घेतला. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसेल, अशी चर्चा होती. विशेषतः शिवसेनेच्या काही जागा कमी होतील असे अंदाज होते. मात्र, निकालाने ही शक्यताही फोल ठरवली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com