साखर उद्योगासाठी नजीकचा काळ आव्हानात्मक : कर्नाटकचे मंत्री निरानी

नजीकचा काळ हा साखर उद्योगासाठी आव्हानात्मक काळ असल्याचे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे मोठे आणि मध्यमउद्योग विभाग मंत्री मुरुगेश निरानी यांनी केले.
साखर उद्योगासाठी नजीकचा काळ आव्हानात्मक : कर्नाटकचे मंत्री निरानी
साखर उद्योगासाठी नजीकचा काळ आव्हानात्मक : कर्नाटकचे मंत्री निरानी

पुणे : कर्नाटकात पूर्वी गाळप हंगाम हा तब्बल नऊ महिने चालत असे.  मात्र आता उत्तर कर्नाटकसारख्या भागात ओढून ताणून तो केवळ शंभर दिवसांवर आला आहे. यामुळे या क्षेत्रात टिकून राहणे आणि ‘एफआरपी’प्रमाणे  किंमत देणे हे दिवसेंदिवस अवघड होत असल्याने नजीकचा काळ हा साखर उद्योगासाठी आव्हानात्मक काळ असल्याचे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे मोठे आणि मध्यम उद्योग विभाग मंत्री मुरुगेश निरानी यांनी केले. डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (डीएसटीए) चे ६६ वे वार्षिक अधिवेशन यशदा येथे नुकतेच झाले. त्या वेळी मंत्री श्री. निरानी बोलत होते. केंद्रीय रस्ते  वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी हे ऑनलाइन पद्धतीने यात सहभागी झाले होते. डीएसटीएचे अध्यक्ष शहाजी भड, कार्यकारी सचिव आरती देशपांडे, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएच्या ६६ व्या वार्षिक संमेलनाच्या आयोजन समितीचे प्रमुख सोहन शिरगावकर, राष्ट्रीय साखर संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल आणि राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. श्री. निरानी म्हणाले, ‘‘कर्नाटकात आम्ही इथेनॉल सोबतच बायप्रोडक्ट मोठ्या प्रमाणात उत्पादित करीत असल्याने एफआरपी पेक्षा २०० ते ३०० रुपये भाव देणे आम्हाला शक्य होत आहे. मात्र भविष्यात हे आणखी कठीण होत जाईल असा आमचा अंदाज आहे. देशात उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होत असले तरीही केवळ महाराष्ट्रामधूनच आज संपूर्ण देशभरात इथेनॉलशी संबंधित प्रॉडक्ट्स येत आहेत. ऊस उत्पादन व तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र करीत असलेल्या  कामाची दखल देशपातळीवर घेतली जाते. कर्नाटक सरकारदेखील त्याचे अनुकरण करते.” साखर उत्पादन व संबंधित संस्थांकडून उत्पादन, शेती, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन आदी विषयांवर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यातील संस्थेच्या सभासदांकडून मागविण्यात आलेल्या सर्वोत्तम ४२ शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशनदेखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वोत्कृष्ट शोध निबंधासाठी दिले जाणारे मंगल सिंह सुवर्ण पदक यंदा मुंबई साखर संघाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. एस. मराठे यांना प्रदान करण्यात आले. साखर उद्योग गौरव पुरस्कारांचे वितरण  साखर उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या डॉ. प्रमोद चौधरी,  नरेंद्र मोहन अग्रवाल, कांतिभाई पटेल, बाळकृष्ण जमदग्नी आणि बी. डी. पवार या असोसिएशनच्या सभासदांना जीवन गौरव पुरस्कार तर साखर उद्योगात कार्यरत असणाऱ्या मुरुगेश निरानी, राजाभाऊ शिरगावकर, विद्याधर अनास्कर, रोहित पवार, समरजितसिंह घाडगे आणि हसमुख भाई भक्ता यांना त्यांच्या साखर उद्योगातील योगदानासाठी साखर उद्योग गौरव पुरस्कार देत गौरविण्यात आले. प्रतिक्रिया... पुढील दोन वर्षांचा काळ हा देशातील साखर उत्पादकांसाठी सुवर्णकाळ असल्याचे सांगत इथेनॉलनिर्मितीमुळे साखरेच्या अधिक उत्पादनामुळे उभ्या राहणाऱ्या समस्या सुटतील. - शहाजी भड, अध्यक्ष, डीएसटीए, पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com