मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक : डॉ. एम. बी. पाटील

Necessary fertilizer for sweet lemon : Dr. M. B. Patil
Necessary fertilizer for sweet lemon : Dr. M. B. Patil

औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती करण्यात सर्वात मोठा हातभार लावते. या पिकामध्ये काटेकोर आणि खतमात्रा देणे फार आवश्यक आहे. मोसंबीत सर्व शेतकरी फार कमी प्रमाणात खतमात्रा वापरतात. त्यामुळे त्यांना उत्पन्न फार कमी मिळते. यामुळे सर्वांनी नियोजित व आवश्यक खतमात्रा देणे गरजेचे आहे,’’ असे मत हिमायतबाग फळबाग संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबादतर्फे देवगाव (ता. पैठण) येथे आयोजित ‘सुधारित मोसंबी लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन’ कार्यक्रमात पाटील बोलत होते. औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, पैठण तालुका कृषी अधिकारी रामेश्वर मोटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, अशोक निर्वळ आदी उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी बागेमध्ये आंबिया बहाराची नवती व फुले यायला सुरुवात झाली आहे. या नवतीवरच सीट्रससील, मावा व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची पहिली फवारणी डायमेथोएट ०२ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस ०१ मि.लि, दुसरी फवारणी १२-१५ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा थायेमिसॉक्झाम ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात करावी. त्याचबरोबर खत व पाण्याची आवश्यकता आंबे बहाराच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक झाडाला प्रत्येक दिवशी ५० लिटर पाणी देणे आवश्यक आहे.’’

‘‘मार्चमध्ये ६० लिटर, एप्रिलमध्ये ७० लिटर व मेमध्ये ८० लिटर पाणी द्यावे. खताच्या मात्रा दिल्या नसतील, तर शेणखत ५० किलो प्रतिझाड, ८०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ४०० ग्रॅम पालाश त्याचबरोबर २५० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. जास्तीच्या तापमानामुळे फुलगळ किंवा फळगळ होत असेल, तर दोन ते तीन फवारण्या कराव्यात. त्यामुळे फळगळ कमी होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन येऊ शकते,’’ असेही डॉ. पाटील म्हणाले.

 सुधारित तंत्रज्ञान वापरा

डॉ. मोटे म्हणाले, ‘‘प्रत्येक शेतकऱ्याने सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे.’’ डॉ. झाडे यांनी मोसंबी पिकासोबत स्पर्धा करणारी आंतरपिके घेऊ नयेत, असे सांगितले. मोसंबीच्या बागेत ठिबक सिंचनाने पाणी व त्याचे नियोजन याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पिसुरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com