शेतकरी कर्जमाफीसाठी गरज ३० हजार कोटींची

Need 30 thousand crore for farmers loan waiver
Need 30 thousand crore for farmers loan waiver

मुंबई  : राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन वचनपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यापैकी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेतील ६ हजार कोटी रुपये तिजोरीत शिल्लक आहेत, त्यात ही तरतूद करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती वित्त विभागातील उच्चपदस्थांकडून मिळाली. 

दरम्यान, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचे स्वरूप लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यात संबंधित शेतकऱ्यांना अंदाजे ४० ते ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाईल, असे सांगितले जाते. 

निवडणुकीआधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. तसेच वेगवेगळी विचारधारा असलेल्या या तीन पक्षांनी एकत्र येताना किमान समान कार्यक्रम निश्चित केला. यातही राज्यातील शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याची सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर विविध जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत तसेच व्यापारी बँका यांचे सुमारे ३० हजार कोटींचे पीक कर्ज असावे असा अंदाज आहे. त्यात थोडेफार कमी-अधिक होऊ शकते, हे गृहीत धरून आवश्यक आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे. 

फडणवीस सरकारने आतापर्यंत ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ८९१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. त्या कर्जमाफीपोटी तेव्हा २४ हजार कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६००० कोटी अद्यापही शिल्लक आहेत. त्यामुळे मार्च २०२० मध्ये अर्थसंकल्पात आणखी २५ हजार कोटींची तरतूद केल्यास कर्जमाफीसाठी एकूण ३० हजार कोटी उपलब्ध होणार आहेत. 

थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतो. मात्र नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना होत असते. त्यापार्श्वभूमीवर अशा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजना राबवण्यात येणार आहे. फडणवीस सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. महाविकास आघाडी सरकारकडून साधारण त्याच्या दुप्पट ४० ते ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाईल, असे खात्रीशीररित्या समजते. 

अवकाळीग्रस्तांसाठी विशेष मदत देण्याचा विचार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात क्यार आणि महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसाचा राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. पंचनाम्यानुसार सुमारे ९३ लाख हेक्टरवरील शेतीपिके आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक कोटी ३ हजार शेतकरी या संकटाने भरडले आहेत. त्यांनाही तातडीने मदत देण्याबाबतची तयारी करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे हा किती आर्थिक भार तिजोरीवर पडेल याचीही आकडेमोड सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com