रेशीम विभागास पुरेसे मनुष्यबळ देण्याची गरज ः दांडेगावकर

Need for adequate manpower for Silk Department: Dandegaonkar
Need for adequate manpower for Silk Department: Dandegaonkar

परभणी ः महिन्याकाठी शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने रेशीम शेती उद्योग शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत आहे. परंतु, अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर या विभागाचा गाडा सुरू असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने या विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी गुरुवारी (ता. १२) केले.

पूर्णा येथे रेशीम कोष खरेदी बाजारपेठ आणि धागानिर्मिती केंद्राच्या उद्‍घाटन कार्यक्रमामध्ये दांडेगावकर बोलत होते. या वेळी वसमतचे आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, रेशीम उपसंचालक अर्जून गोरे (नागपूर), दिलीप हाके (औरंगाबाद), जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी. आर. कदम (परभणी), पी. बी. नरवाडे (नांदेड), स्वप्निल तायडे (हिंगोली), डॉ. संजय लोलगे, संभाजी मोहिते, किशनराव पारवे, उत्तम काळपांडे, पी. एस. देशपांडे आदी उपस्थित होते.

दांडेगावकर पुढे म्हणाले, की दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटामुळे शेती व्यवसायापुढे आव्हाने निर्माण झालेली आहेत. त्यामुळे उत्पन्नाची खात्री असलेल्या रेशीम शेतीकडे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी वळत आहेत. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने जीवनमानात सुधारणा होत आहे. त्यामुळे रेशीम विभागाचे बळकटीकरण करणे आवश्यक  आहे. 

आमदार नवघरे म्हणाले, की रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. गोरे म्हणाले, की धागा निर्मिती उद्योगासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. 

हाके म्हणाले, की प्रत्येक तालुक्यात बाल्य रेशीम किटक संगोपनगृह (चॅाकी सेंटर) सुरू केले जातील. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीसाठी धागा निर्मिती सोबत रेशीम कापड निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. पूर्णा येथील पांगरा रस्त्यावरील सुरू करण्यात आलेल्या बाजारपेठेत रेशीम कोषाची खरेदी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोष विक्रीस आणले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com