संतुलित खत वापराबाबत जागृतीची गरज

fertilizer
fertilizer

पुणे: महाराष्ट्राचा शेतकरी इतर राज्यांच्या तुलनेत शेतीमध्ये आघाडीवर आहे. मात्र, सूक्ष्म अन्नद्रव्यांवर आधारित संतुलित खत वापरावर प्रत्येक गावात जनजागृती करावी लागेल. यामुळे शेतीमधील खर्च कमी होतील, तसेच दर्जेदार उत्पादनवाढ व जमीन सुपीकता साध्य होईल, असा सूर फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएआय) प्रतिनिधींसोबत झालेल्या संवादात व्यक्त झाला.   'एफएआय'च्या प्रतिनिधींनी 'अॅग्रोवन'ला भेट दिली असता राज्याच्या कृषी वाटचालीबाबत अनौपचारिक चर्चा झाली. 'स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड'चे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, ‘गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड अशा विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'एफएआय'च्या 'वेस्ट झोन'कडून कृषिविषयक वाटचालींची निरीक्षणे घेतली जातात. आमच्या मते महाराष्ट्रातील शेतकरी तुलनेने प्रयोगात आघाडीवर आहेत. आधुनिकता व तंत्रज्ञानाची कास धरून फलोत्पादन, पुष्पोत्पादन तसेच नगदी पिकांमध्ये शेतकरी वर्गाचा पुढाकार आहे. अर्थात यात ‘अॅग्रोवन’ची भूमिका अतिशय मोलाची आहे.’’ 'ॲग्रोवन’मुळे बसली जरब “कृषिविषयक धोरणात्मक घडामोडी, यशोगाथा, स्मार्ट शेतकरी पुरस्कार, कृषी प्रदर्शने, सरपंच परिषद अशा ‘अॅग्रोवन’च्या सर्व उपक्रमांची मदत कृषी व्यवस्थेला होत असते. ‘अॅग्रोवन’मुळे कृषी व्यवस्थेमधील मरगळ निघून गेली आणि जरबदेखील बसली आहे,” असे स्पष्ट करीत श्री. पाटील म्हणाले, ‘‘कृषी व्यवस्था पुढारलेली असली तरी पीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचे काम वाढवावे लागेल. उसाचे उदाहरण घेतले तरी जादा उत्पादनावर लक्ष दिले जाते; मात्र उसाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांबाबत जागृती झालेली नाही.’’ आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक एस. आर. भावसार म्हणाले, ‘‘इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नत्र, स्फुरद, पालाश (एनपीके) गुणोत्तर राखण्यात यश येते आहे. शेतकऱ्यांची प्रयोगशीलता वाढल्यामुळे हे शक्य होत असून त्यात ‘अॅग्रोवन’चा वाटा मोठा आहे. खत उद्योगातील आमच्यासारख्या नामांकित कंपन्यांचे सर्व अधिकारी ‘अॅग्रोवन’ वाचूनच कामकाजाला सुरुवात करतात. ऑनलाइन मीडियातदेखील आता ‘अॅग्रोवन’ आघाडीवर असल्यामुळे कृषी विस्ताराला हातभार लागेल.’’  बीईसी फर्टिलायझर्सचे उपमहाव्यवस्थापक राजशेखर कोल्हे यांनीदेखील शेतकऱ्यांना अभ्यासू करण्याच्या प्रक्रियेत इनपुट कंपन्या व ‘अॅग्रोवन’ या दोन्ही घटकांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. ‘‘सिंगल सुपर फॉस्फेटच्या शास्त्रशुद्ध वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये आणखी जागृती करावी लागेल. त्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करण्यास तयार आहोत,’’ असे श्री. कोल्हे म्हणाले. जैविक खतांच्या वापरात वाढ यानंतर झालेल्या चर्चेत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जैविक खतांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे नमूद केले. विश्वासार्ह उत्पादने बाजारपेठांमध्ये उपलब्ध होत राहिल्यास जैविक उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कृषी विभागाबरोबरच कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे तसेच खासगी कंपन्यांच्या जैविक प्रयोगशाळांमधून शेतकऱ्यांना आणखी सेवा मिळाल्यास जैविक उत्पादनांची बाजारपेठ वाढू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले. “शेतकऱ्यांना युरियाच्या जादा वापरापासून संतुलित खत व्यवस्थापनाकडे न्यावे लागेल. केवळ नत्र, स्फुरद, पालाशचा वापर नव्हे; तर सूक्ष्म अन्नद्रव्येदेखील पिकांसाठी किती उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन सांगावे लागेल. हरितक्रांतीमुळे एनपीकेचा वापर वाढला, मात्र इतर अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सूक्ष्म अन्नद्रव्यांवर काम हवे ठिबक तंत्राचा प्रभावी वापर, जोडीला सूक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खते अशा मुद्द्यांवर राज्यात काम करावे लागेल. माती परीक्षणापासून ते काढणीपर्यंतच्या साखळीपर्यंत राज्यातील हजारो गावांमध्ये शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनाचे असलेले महत्त्व सांगावे लागणार आहे. नाशिक, पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शेतकरी आता शास्त्रज्ञांप्रमाणे शेतीचे व्यवस्थापन करीत आहेत. मात्र, इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी कृषी उद्योजक व ‘अग्रोवन’ला एकत्रितपणे काम करण्यास वाव आहे, असाही सूर या चर्चेतून निघाला.  आरसीएफचे महाव्यवस्थापक मुकुंद रिसवडकर, श्री पुष्कर केमिकल्स फर्टिलायझर्सचे उपाध्यक्ष राकेश पुरोहित, झुआरीचे मुख्य व्यवस्थापक प्रमोद चौगुले व प्रणव खामकर, बसंत केमिकल्सचे समन्वयक दामोदर भुतडा, खेतान केमिकल्सचे स्टेट मॅनेजर सुधीर आरोळकर यांनीही चर्चेत भाग घेतला.  या वेळी ‘एफएआय’ व ‘एसएसपी’ असोसिएशनच्या संयुक्त प्रयत्नाने सिंगल सुपर फॉस्फेटच्या वापराबाबत तयार करण्यात आलेल्या स्टिकरचे प्रकाशन अॅग्रोवनचे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळ माध्यम समूहात ‘अॅग्रोवन’च्या संपादक-संचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल आदिनाथ चव्हाण यांचा फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएआय) वतीने सत्कार करण्यात आला.  ‘अॅग्रोवन’ची भूमिका प्रबोधन आणि संघर्षाची ‘अॅग्रोवन’चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण या वेळी म्हणाले, ‘‘भविष्यात काटेकोर शेती, रासायनिक अवशेषमुक्त शेती उत्पादनांना महत्त्व येणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे आधार म्हणून आपण एकत्रितपणे काम करायला हवे. गेल्या १५ वर्षांपासून ‘अॅग्रोवन’ कृषी ज्ञानाची एक मोठी चळवळ चालवितो आहे. प्रबोधन आणि संघर्ष अशा दोन्ही पातळ्यांवर आम्ही काम करतो आहोत. कष्टकरी शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्यभर पोचविणे, आधुनिक शेतीची माहिती देणे अशी भूमिका ठेवतानाच कृषी व्यवस्थेतील चुकीच्या, गैर परंपरांना चव्हाट्यावर आणण्याचे काम ‘अॅग्रोवन’ची टीम करते आहे. राज्यातील कृषी उद्योजकांनीही त्यांच्या समस्या मनमोकळ्या पद्धतीने आमच्या व्यासपीठावर मांडाव्यात. त्यामुळे कृषी विस्तार व्यवस्था आणखी भक्कम होईल.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com