मिथेन उत्सर्जनावर नियंत्रणाची गरज

जनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू वातावरणात सोडला जातो. त्याचा परिणाम हा तापमान वाढीवर होतो. हे लक्षात घेऊन जागतिक पातळीवर जैवतंत्रज्ञानाद्वारे जनुकीय बदल करून मिथेनचे उत्सर्जन कमी करणाऱ्या पशुधनाची निर्मिती करण्याबाबत संशोधन सुरू आहे.
supply a balanced feed to milch animals
supply a balanced feed to milch animals

जनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू वातावरणात सोडला जातो. त्याचा परिणाम हा तापमान वाढीवर होतो. हे लक्षात घेऊन जागतिक पातळीवर जैवतंत्रज्ञानाद्वारे जनुकीय बदल करून मिथेनचे उत्सर्जन कमी करणाऱ्या पशुधनाची निर्मिती करण्याबाबत संशोधन सुरू आहे.  ओझोन दिनानिमित्त पर्यावरण आणि तापमान वाढ यावर खूप चर्चा होते. विशेषतः हरितगृह वायू आणि त्यातही मिथेन वायूचे प्रमाण, वातावरणावर त्याचा परिणाम आणि त्याच्या उत्पत्तीसाठी जबाबदार असणारे पशुधन, आणि पशू व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांची चर्चा होत आहे. जागतिक स्तरावर ज्यावेळी याबाबत चर्चा होते त्यावेळी 'भारतीय पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे' असे सांगितले जाते.हे एक प्रकारचे आपल्यासाठी भविष्यातील आव्हान राहणार आहे. येत्या काळात वातावरणातील तापमान वाढ आणि त्याचे दुष्परिणाम जसे जसे वाढत जातील तसे याबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले जातील.  असे आहेत निष्कर्ष  

  • जागतिक पातळीवर मिथेनचे उत्सर्जन वाढत चालले आहे, त्याचे एक मोठे कारण हे पशुधन आहे. जनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू वातावरणात सोडला जातो. त्याचा परिणाम हा तापमान वाढीवर होतो असा हा निष्कर्ष आहे. 
  • कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅंड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशन  (सीएमआयआरओ) मधील संशोधक आणि ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे कार्यकारी संचालक डॉ. पेप कॅनाडेल यांच्या म्हणण्यानुसार सन २००० पर्यंत स्थिर असणारे मिथेन उत्सर्जन हे खूप मोठ्या वेगाने वाढत आहे. भात उत्पादन, जनावरांची संख्या, पाणथळ जागेतील कचरा, वाढते औद्योगीकरण,त्याच बरोबर तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन हे सर्व मिथेन उत्सर्जन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत.
  • उष्णता वाढवणारे एकूण सहा वायू जे हरितगृह वायू म्हणून ओळखले जातात त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन,बाष्प, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, आणि सीएफसी, याचा समावेश आहे. हे सर्व वायू उष्णता साठवून ठेवतात म्हणून त्यांना हरितगृह वायू म्हणतात. त्यापैकी मिथेन वायूमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे तो वातावरण उबदार करतो आणि वातावरणातील तापमान वाढीसाठीचा मुख्य घटक ठरतो. त्यामुळे मिथेन वायू आणि त्याचे उत्पादन आणि उत्सर्जन यावर सर्व जगाने लक्ष केंद्रित करून ग्लोबल मिथेन बजेट उभे करून त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना सुचवत आहेत. 
  • मिथेन चे जैविक ऊर्जेत रूपांतर करून त्याचा वापर मानव कल्याणासाठी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. एकंदर सध्या जागतिक  होत असलेली तापमान वाढ आणि आणि त्याचे परिणाम भयंकर आहेत, याबाबत सर्व वैज्ञानिकांचे एकमत झाले आहे.
  • तापमान वाढीचे परिणाम  

  • हवेतील बाष्पाची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, आणि नायट्रस ऑक्साईड यामुळे पृथ्वीचे भूपृष्ठ आणि वातावरणाचे तापमान वाढते. 
  • वातावरणाच्या थरावर सूर्यकिरणे पडतात  ती शोषली जातात किंवा उत्सर्जित होतात. उत्सर्जित होणारी सूर्यकिरणे हरित़गृह वायू शोषून घेतात आणि तापमान वाढ करतात. 
  • वाढते औद्योगीकरण व कृषी क्षेत्रातील उत्पादित होणाऱ्या वायू उत्सर्जनामुळे देखील पृथ्वीचे तापमान वाढत आहे. साधारणपणे सन १७५० मध्ये औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली. तेव्हापासून हवेतील कार्बन डायऑक्साइड ३० टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या शंभर वर्षात पृथ्वीचे तापमान सरासरी ०.८ अंश सेल्सिअसने वाढले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या तीन दशकात ०.६ अंश सेल्सिअसने  वाढले आहे. परिणामी समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ, हिमनग वितळणे, अतिवृष्टी, अति थंडी, गारपीट आणि ढगफुटी याच बरोबर प्रदूषण देखील वाढत आहे. त्याचा परिणाम मानवासह पाळीव प्राणी, वन्य प्राणी, वनस्पती यांच्यावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांचा परिणाम 

  • जनावरे रवंथ करत असताना आणि शेणांद्वारे मिथेन  वायू उत्सर्जित करत असतात. यामध्ये गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच हत्ती, जिराफ वगैरे जंगली प्राण्यांचा समावेश आहे. 
  • रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये एकूण चार पोट असतात. त्याला रुमेन,रेटीक्युलम,ओमॅझम आणि अॅबोमॅझम असे म्हणतात. पैकी पहिले पोट रुमेन यामध्ये सूक्ष्मजीव जसे जिवाणू, एक पेशीय सजीव, बुरशीजन्य पेशी असतात. ते वैरणीचे पचन करण्यासाठी मदत करतात. यापैकी जे पचनास जड आहे ते दोन नंबरच्या पोटात रेटीक्युलम येथे येऊन परत जनावराच्या तोंडात घेऊन त्याचे चर्वण केले जाते, त्याचे बारीक तुकडे करून ते पचनीय बनवले जाते. यालाच आपण रवंथ करणे असे म्हणतो. तिसऱ्या पोटात आणखी त्यावर प्रक्रिया होऊन पूर्णपणे पचनयोग्य बनवले  जाते. त्यानंतर चौथे पोट अॅबोमॅझममध्ये त्यातील सर्व अन्नघटक शोषले जाऊन  मग पुढे ते लहान आतडे, मोठे आतडे असा प्रवास करत शेवटी शेणांच्या रूपात बाहेर फेकले जाते. या सर्व प्रक्रियेत मुख्य पोटात रूमेन मध्ये किण्वन प्रक्रियेद्वारे पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर होते. या प्रक्रियेत वायुरूप मेदाम्ले(व्होलाटाईल फॅटी अॅसिड) म्हणतात. त्यांची  आणि वायूची निर्मिती होते. हे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड व मिथेन. पुढे मेदाम्ले यकृतात जाऊन त्याचे ऊर्जेत रूपांतर होते. 
  • साधारणपणे मोठी जनावरे सुमारे २०० ते २५० लिटर आणि शेळ्या मेंढ्या ३० ते ४० लिटर मिथेन उत्पादन करतात. विसाव्या पशुगणने प्रमाणे आपल्या देशातील पशुधन ५३५ दशलक्ष असून ते जगाच्या एकूण पशुधनाच्या १३ टक्के आहे. यावरून मिथेन उत्सर्जनात आपल्या पशुधनाचे योगदान किती आहे हे आपल्या लक्षात येईल. 
  • कंपोस्ट खड्डे, शेणाचे ढीग ज्यामध्ये वाया गेलेली वैरण सुद्धा असते. यामध्ये सुद्धा किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन वायू तयार होत असतो. तो वातावरणात सोडला जातो. त्याचा परिणाम पशुधनाच्या उत्पादन क्षमतेवर देखील होतो.  
  • सतत पाण्याने भरलेल्या भात शेतीमुळे देखील मोठ्या प्रमाणात मिथेन वायूचे उत्पादन होत असते.
  • जनावरांतून मिथेन निर्मिती कमी करण्यासाठी उपाययोजना 

  • जगभरात मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करून तापमान वाढ रोखण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. जनावरे काय खातात, त्यावर मिथेन उत्सर्जन अवलंबून आहे. विशेषतः नुसतेच वाळलेले गवत आणि हिरवी वैरण मोठ्या प्रमाणात दिल्याने मिथेन वायू उत्सर्जन जादा होते. त्यासाठी संतुलित आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आतड्यातील किण्वन प्रक्रियेत बदल होऊन दूध उत्पादन क्षमता वाढते. 
  • पारंपारिक आहारामुळे ऊर्जा, प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होतो. त्यासाठी नियंत्रित संतुलित आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच समुद्री शैवालाचा वापर केल्याने देखील मिथेन उत्पादन कमी होते. पण काही शास्त्रज्ञांच्या मते त्याची खारट चव जनावरांना आवडत नाही.
  • गोबर गॅस निर्मिती करून देखील अतिरिक्त मिथेन वायू जैविक इंधन म्हणून आपण वापरू शकतो. 
  • अॅडलेड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया, इटली, इस्राईल येथील विद्यापीठांमध्ये जैवतंत्रज्ञानाद्वारे जनुकीय बदल करून मिथेनचे उत्सर्जन कमी करणाऱ्या पशुधनाची निर्मिती करण्याबाबत संशोधन सुरू आहे. 
  • अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रात वाढलेला मांसाहार व त्यासाठी निर्माण केलेल्या विशिष्ट प्रजाती आणि त्यांचे खाद्य यामुळेसुद्धा मिथेन उत्सर्जन  वाढत आहे. अमेरिकेतील एका कंपनीने  त्यांच्या सर्व जनावरांच्या आहारामध्ये 'लेमनग्रास' गवताचा समावेश करायला सुरुवात केली आहे. त्यांचा असा दावा आहे की त्यामुळे ३३ टक्के दैनंदिन मिथेन उत्सर्जन प्रति गाय कमी होते. अशा प्रकारच्या संशोधनाद्वारे उत्पादन व उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • भारतासारख्या खंडप्राय देशात पशूधन आधारित सर्वच बाबी पुढे येत आहेत. आतापासूनच आपण सावध होऊन एकंदरच पर्यावरणाच्या दृष्टीने कमीत कमी नुकसान होण्यासाठी पुन्हा एकदा बायोगॅस योजना मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित करावी लागेल. 
  • बायोगॅस मध्ये ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते. त्याचा वापर करून 'ड्युएल फ्युएल' डिझेल इंजिन पद्धती वापरून  विद्युत निर्मिती सुद्धा करता येते. सीएनजीमध्ये सुद्धा मिथेन मुख्य घटक असतो. त्याचाही वापर आता जगभर 
  • वाढत आहे. 
  • पशुपालकांना बायोगॅससह संतुलित आहाराबाबत नियमित मार्गदर्शन आणि भटक्या अनुत्पादित पशुधन याची संख्या कमी करणे गरजेचे 
  • आहे. 
  • स्थानिक उपलब्ध होणाऱ्या वैरणीपासून संतुलित आहार तयार करण्याचे प्रशिक्षण पशुपालकांना मिळाल्यास निश्चित आपण मिथेन उत्सर्जन कमी करू शकतो.
  • संपर्क- डॉ.व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५ (सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन),सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com