शेतकरीहिताची चळवळ उभी राहावी ः सुनिल तटकरे

farmers literature festival
farmers literature festival

अलिबाग : देशातील विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शेती करणे आता नकोसे झाले आहे. शेतकरी टिकला, तरच देश टिकेल. याकरिता शेतकऱ्यांच्या हिताची चळवळ उभी राहिली पाहिजे. या चळवळीला दिशा देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनास कुरुळ येथील क्षात्रैक्य सभागृहात प्रारंभ झाला. संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी शनिवारी (ता. ८) खासदार तटकरे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार-खासदार संजय राऊत, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव, ॲड. सतीश बोरूळकर, ॲड. प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  खासदार तटकरे म्हणाले, ‘‘शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी उभा राहिला पाहिजे या भूमिकेतून काम केले. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी ते लढले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नवे सरकार महाराष्ट्रात आले आहे. या सरकारच्या माध्यमातून सात बारा कोरा करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र नुसता सातबारा कोरा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. तर शेतीत मिळणारे उत्पादन व होणारा खर्च यांची सांगड घालून विकासाचे काम करणे आवश्यक आहे.’’ खासदार राऊत म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याचे काम शरद जोशी यांनी प्रामाणिकपणे केले आहे. शेतकऱ्यांसाठी असलेले नेतृत्व ना त्यांच्या आधी नव्हते. ना त्यांच्या नंतर झाले आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते. त्यांनी या प्रश्नांचे राजकारण केले नाही, तर मला माझा शेतकरी उभा करायचा आहे. या तळमळीने त्यांनी काम केले आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या विषयावर लिखाण केले. तो आसूड शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवला. महाराष्ट्रासह मुंबई टिकविण्याचे काम शेतकऱ्यांनी केले. हे शहरातील नागरिकांनी विसरता कामा नये.’’

बांधावर सरकारने जायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. यादृष्टीकोनातून महाराष्ट्र सरकार काम करण्याच्या प्रयत्नात आहे, असे राऊत यांनी सांगितले. पत्रकार खांडेकर म्हणाले, ‘‘शरद जोशी यांनी गावागावांत जाऊन शेती अर्थशास्त्राचा विचार सहज व सोप्या पद्धतीने पोचविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची अवस्था भयावह आहे. परंतू शेतकऱ्यांच्या समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा बदलत नाही. शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न या व्यवस्थेने कधी केलाच नाही, जे वास्तव आहे, ते कधी साहित्यात उमटताना दिसत नाही.’’ शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी ते गंभीरपणे वाढतच चालले आहेत. चमकदार घोषणांत आपण वावरतो. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती बिकट झाली आहे. याकडे सरकारला बघायला वेळही नाही, ही मोठी शोकांतिका आहे, असे खांडेकर म्हणाले.  या संमेलनासाठी राज्यभरातून शेतकरी उपस्थित असून आज (ता. ९) संमेलनाचा शेवटचा दिवस असणार आहे.  आज पुरस्कार वितरण समारंभ साहित्य संमेलनात आज (ता. ९) पुरस्कार आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या वेळी राज्यमंत्री अदिती ठाकरे, महेंद्र दळवी, प्रशांत नाईक, संजय पानसे, कैलास पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, अध्यक्षस्थानी `ॲग्रोवन`चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण आहेत. ॲड. वामनराव चटप (चंद्रपूर), रमेशभाई बिसानी (वर्धा), सुनील चरपे (नागपूर), चिमणदादा पाटील (जळगाव), उत्तमराव वाबळे (हिंगोली), स्मिता गुरव (नाशिक), जयंत बापट (यवतमाळ) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, विश्‍वस्तरीय ऑनलाइन लेखन स्पर्धा २०१९ च्या विजेत्यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com