पाणीदार प्रदेशासाठी चळवळीची गरज ः जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

Need for movement for watery areas: Rajendra Singh
Need for movement for watery areas: Rajendra Singh

अर्धापूर, जि. नांदेड : महाराष्ट्र हा निसर्गाचा लाडका प्रदेश असल्यामुळे त्याने भरपूर दिले. पण लाडक्या प्रदेशाने गेल्या काही वर्षात निसर्गाचे संतुलन बिघडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे बिनपाण्याचा प्रदेश होण्याची वेळ आली आहे. जमिनीतील पाण्याचा जास्त उपसा केला जात असून जलपुनर्भरणाचे काम कमी आहे. हे काम समतोल राहण्यासाठी ग्रामपातळीवर काम करण्याची गरज आहे. राज्य पुन्हा पाणीदार होण्यासाठी निसर्गाच्या चक्राप्रमाणे पीक पद्धतीत बदल करावा लागेल. पाणीदार प्रदेश करण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले.

अर्धापूर येथील राष्ट्रीय जलपरिषदेत शनिवारी (ता. २८) ते बोलत होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून पाण्याचे व जलसंवर्धनाचे महत्त्व उलगडून सांगितले. डाॅ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मराठवाडा जिओग्राफिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. उदय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

या परिषदेच्या उद्‍घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. रावसाहेब शेंदारकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशदाचे जल साक्षरता प्रमुख डाॅ. सुमंत पांडे, प्राचार्य डाॅ. हनुमंत भोपाळे, बालाजी चव्हाण, डाॅ. विशाल लंगडे, प्रवीण देशमुख, आर. आर. देशमुख आदी उपस्थित होते. 

राजेंद्र सिंह म्हणाले की, जमिनीतून जास्तीत जास्त पाणी काढण्यासाठी अभियंते पुढे आले. यंत्रसामग्री तयार झाली. पण पाणी जमिनीत जिरवण्याचे काम झाले नाही. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीची लूट करण्यात आली आहे. त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत आहे. देशातील आरबीआय बॅंकेपेक्षा पाण्याची बॅंक मोठी आहे. या बॅंकेतील पाण्याची बचत वाढविण्याची गरज आहे. आपण वारेमाप उपसा करून तिचे पोट रिकामे करित आहोत. पावसाचा पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत साठविणे, जलपुनर्भरण, पुनर्वापर, संवर्धनाकामी पाण्यावर येणारी पिके याबाबत नियोजन करून काम करण्याची आवश्यकता आहे. तसेच दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदीचा अभ्यास करण्याची गरज असून ‘चला गोदावरीकडे’ हे अभियान सुरू करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

महाविद्यालयाच्या वतीने जलसंवर्धनासाठी व जलसाक्षरतेसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही रावसाहेब शेंदारकर यांनी दिली. या वेळी डाॅ. परमेश्‍वर पौळ यांनी आभार मानले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डाॅ. आर. बी. कोटलवार, साईनाथ शेटट्टो, डाॅ. जे. सी. पठाण, आर. बी. पाटील, डाॅ. नजम, बी. सी. आव्हाड यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com