पशुखाद्यनिर्मितीसाठी धोरणात्मक विचार आवश्‍यक

पशुखाद्यनिर्मितीसाठी धोरणात्मक विचार आवश्‍यक
पशुखाद्यनिर्मितीसाठी धोरणात्मक विचार आवश्‍यक

राज्यातील शेतकरीवर्ग तोट्यात शेती करीत आहे. त्याला शेती परवडत नाही. त्यामुळेच पशुसंवर्धन क्षेत्रात सतत धडपड करून तो दिवस काढत असतो. पशुसंवर्धनात पुन्हा डेअरी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बाजवत असून, ही डेअरी क्षेत्रातील चढउतार पूर्णपणे पशुआहार बाजारावर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत पशुआहार निर्मिती प्रचंड प्रमाणात महागली असून, पशुखाद्य बाजारात उलथापालथ झालेली आहे.

पशुखाद्य निर्मितीसाठी मुखत्वे कच्चा माल म्हणून मका लागतो. पशुखाद्य तयार करण्यासाठी आधी प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रुपये दराने मका खरेदी केली जात होती. हा दर अनेकदा परवडत नाही. मात्र, शेतकरी वर्गाला हातभार लावण्यासाठी या दरालादेखील कोणी विरोध केला नाही. परंतु, मक्याचे अभूतपूर्व शॉर्टेज तयार झाले आणि अगदी २६००-२७०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करण्याची वेळ पशुखाद्य निर्मिती उद्योगावर आली. यातून भरमसाट तोटा वाढला. पशुखाद्य बाजारात दर वाढले. त्याचा फटका पशुपालक व दूध उत्पादक शेतकरी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे स्वस्त मक्याची आयात तातडीने झाली पाहिजे.

पशुखाद्य निर्मितीसाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा महागड्या डीओसीचा म्हणजे तेलपेंडचा आहे. सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे, सूर्यफूल याची तेलपेंड वापरली तरच दर्जेदार पशुआहार तयार होतो. कितीही महागले तरी तेलपेंड आम्ही योग्य प्रमाणात पशुखाद्य तयार करताना टाकतो. त्यामुळे जनावरे अधिक गुणवत्तापूर्ण दूध तयार करण्यात यशस्वी होतात.

तेलपेंड बाजारातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत आम्हाला प्रतिक्विंटल १९००-२००० ऐवजी ३८०० ते ३९०० रुपये दराने तेलपेंड खरेदी करावी लागते आहे. यामुळे पशुखाद्य कारखान्यांचे तोटे वाढत गेले. अर्थात, त्यामुळेच पशुखाद्याचे भाव वाढून पशुपालक शेतकरी वर्गाच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. पशुखाद्य निर्मितीमधील कच्च्या मालाची दरवाढ डेअरी प्रमाणेच पोल्ट्री उद्योगाला प्रचंड प्रमाणात नुकसान करणारी ठरते आहे. राज्यकर्त्यांना या घडामोडींची माहिती असायला हवी व धोरणात्मक सुधारणा करायला हव्यात.

सर्व प्रथम सोयापेंड निर्यात अनुदान तातडीने रद्द करण्याची गरज आहे. कारण, अनुदान रद्द केल्याशिवाय देशी बाजारात उपलब्धता अजिबात वाढणार नाही. त्यामुळे पशुखाद्य दरदेखील कमी होणार नाहीत. माझ्या मते मक्याची आयातदेखील वाढविणे गरजेचे आहे. कारण देशी बाजारात पशुखाद्य निर्मितीसाठी आयात मका प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रुपये दराने उपलब्ध झाला, तर हा गुंता थोडा सुटेल. या दरात मका राहिल्यास शेतकरी वर्गालादेखील पीक परवडते. या दरात पशुखाद्यनिर्मिती करण्यासाठी मका घेणे डेअरी व पोल्ट्री उद्योगलाही परवडणारे असेल. मका आणि तेलपेंड उपलब्धता भरपूर प्रमाणात असेल तरच पशुखाद्य दर संतुलित राहतील. दूध उत्पादनाचा खर्च मर्यादित राहील.

- दशरथ माने, अध्यक्ष, सोनई डेअरी उद्योग समूह 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com