कोरोनोसंदर्भात बाजार समित्यांमध्ये उपाययोजनांची गरज

Need for solutions in market committees regarding coronas
Need for solutions in market committees regarding coronas

अकोला ः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शाळा, कॉलेज बंद करण्यात आले असून सार्वजनिक उत्सव, समारंभांनाही अटकाव करण्यात आला. सध्या बाजार समित्यांमधील गर्दी मात्र कायम असल्याने तेथेही उपाययोजना करण्याची आवश्‍यकता व्यक्त होत आहे. बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत सुरू ठेवायचे किंवा नाही, याबाबत प्रशासनाकडून बाजार समित्यांना कुठलेही आदेश नसल्याने अद्याप तेथील व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहेत.

शासनाने साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदींनुसार, कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून विविध उपाययोजना अमलात आणल्या. ३१ मार्चपर्यंत शाळा, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात येत आहेत. आता मंदिरे बंद करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास बंदी घातली आहे. अशा स्थितीत बाजार समित्यांमधील होणारी गर्दी पाहता तेथे किमान उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

या भागातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कामकाज केले जात आहे. कुठलेही व्यवहार थांबलेले नाहीत. बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, तूर या धान्यांची आवक वाढलेली आहे. सोमवारी (ता. १६) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा विक्रीसाठी आला होता. तुरीचीही दोन हजार क्विंटलवर तर गव्हाची एक हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्रीसाठी, इतर धान्य विक्रीसाठी दररोज हजारोंची गर्दी झाली होती. 

कोरोना विषाणूसंदर्भात बाजार समितींमार्फत जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांची एकाच वेळी व एकाच ठिकाणी गर्दी टाळण्याबाबत अडते, व्यापाऱ्यांना कळविले जात आहे. बाजार समित्यातील व्यवहारांबाबत अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही सूचना नसल्याने कामकाज सुरू आहे. - सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com