कापूस शेतीच्या यांत्रिकीकरणाला गती देण्याची गरज ः डाॅ. वैराळे

कापूस शेतीच्या यांत्रिकीकरणाला गती देण्याची गरज
कापूस शेतीच्या यांत्रिकीकरणाला गती देण्याची गरज

नागपूर ः केंद्रीय कापूस संशोधन संस्थेसोबतच काही कृषी विद्यापीठांनी ट्रॅक्‍टरचलित कापूस वेचणी यंत्रावर काम चालविले आहे. परंतु गेल्या २५ ते ३० वर्षांत यात अपेक्षित यश आले नाही. कापूस शेतीत मजुरांची समस्या लक्षात घेता या सयंत्राच्या संशोधनाला गती येणे गरजेचे आहे. त्याकरिता तात्पुरता पर्याय म्हणून बॅटरीचलित एका व्यक्‍तीला हाताळता येणारे कापूस वेचणी सयंत्र विकसित करण्यासाठी संशोधक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत ज्येष्ठ कापूसतज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी व्यक्‍त केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या भोपाळ (मध्य प्रदेश) येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेत आयोजित कापूस शेतीतील कापणी पश्‍चात तंत्रज्ञान या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. 

देशभरातील कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ यांच्यासह केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. एम. दिन उपस्थित होते. देशात कापूस लागवड क्षेत्र मोठे आहे. महाराष्ट्रात ४१ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाचा पेरा आहे. परंतु हंगामात कापूस वेचणीकामी लागणाऱ्या मजुरांची उपलब्धता आणि त्यावर होणारा खर्च यामुळे कापूस उत्पादक जेरीस आले आहेत. पर्यायी पीकपद्धतीचा विचार त्यांच्या मनात घर करू लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या आवश्‍यकतेवर या वेळी चर्चा झाली

. जागतिक स्तरावर खासगी कंपन्यांनी कापूस वेचणी यंत्र विकसित केले आहेत. विदेशात एकदाच परिपक्‍व होणारे वाण असल्याने त्या ठिकाणी विकसीत सयंत्राची भारतात उपयोगिता नाही. परिणामी भारतीय कापूस शेतीला पूरक असे सयंत्र असावे आणि ते कसे असावे या वरही चर्चासत्रात मंथन झाले. कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सध्या १५ ते २० किलो एका तासात वेचणी शक्‍य होईल, अशी काही सयंत्र उपलब्ध आहेत. त्याची किंमत ४ ते ५ हजार आहे. त्याच दरात बॅटरीचलित कापूस वेचणी यंत्र उपलब्ध झाल्यास कापूस शेतीमधील कष्ट कमी होण्यास मदत होईल. मोठ्या सयंत्रावरील संशोधन देखील या सोबत सुरू राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

कापूस शेतीत श्रम आणि पैशाची बचत होण्यासाठी कापूस वेचणी यंत्राची आजच्या घडीला अत्यंत गरज आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून यात सातत्य आहे. परंतु त्यात संशोधक संस्थांना यश आले नाही. त्यामुळे एका व्यक्‍तीला हाताळता येण्यासारखे छोटे संयंत्र तात्पुरत्या स्वरूपात जरी उपलब्ध करून दिले, तरी ते पुरेसे ठरणार आहे. - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूसतज्ज्ञ, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com